पाकच्या खोडसाळपणावर अजित डोवाल चिडले; SCO ची बैठक अर्धवट सोडली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

एससीओच्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सल्लागारांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये आज पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी खोडसाळपणा केला. 

नवी दिल्ली - शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीमध्ये पाकिस्तानने चुकीचा नकाशा सादर केल्यानं भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बैठक अर्धवट सोडली. एससीओच्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सल्लागारांची ऑनलाइन बैठक रशियाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. यामध्ये आज पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी खोडसाळपणा केला. त्यांनी जाणीवपूर्वक एक खोटा नकाशा सादर केला. जो नकाशा पाकिस्तानने नुकताच तयार केला आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, पाकिस्तानकडून बैठकीच्या आयोजकांनी दिलेल्या सल्ल्याविरोधात आणि नियमांचे उल्लंघन करणारे वर्तन करण्यात आलं आहे. यजमानांसोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तात्काळ विरोध करत बैठक सोडली. पाकने यानंतरही दिशाभूल करणारा नकाशा आणि फोटो दाखवणं बंद केलं नाही. पाकिस्तानने गेल्याच महिन्यात नकाशा जारी केला होता. त्यात लडाख, सियाचीन आणि गुजरातमधी जुनागढ हा भाग पाकिस्तानचा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तान या नकाशाचा अनेकदा प्रचार करत आहे. 

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन महासंघाने राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सचिवांना याबाबत मेसेज पाठवला आहे. यात म्हटलं आहे की, पाकिस्तानने जे केलं त्याचं रशिया कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही आणि आशा आहे की पाकच्या वागण्याचा एससीओमध्ये भारताच्या सहभागावर कोणताही परिणाम होणार नाही. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधातही यामुळे फरक पडणार नाही. यापुढच्या कार्यक्रमात अजित डोवाल सहभागी होतील अशी आशा रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सचिवांनी व्यक्त केली. 

हे वाचा -  कोरोना होणार हंगामी आजार; हर्ड इम्युनिटी आधी अनेक लाटांची शक्यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSA ajit doval left SCO meeting in protest after pak show fake map