उमेदवारांच्या यादीत महिलांचे प्रमाण नगण्य

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

'अफ्स्पा'बाबतची लढाई सुरूच : शर्मिला
लष्कराच्या विशेषाधिकाराबाबत (अफ्स्पा) सोळा वर्षांनी उपोषण सोडले असले, तरी ही लढाई संपलेली नाही, असे इरोम शर्मिला यांनी आज स्पष्ट केले. "अफ्स्पा' हटविण्यासाठी मी राजकीय मार्ग अवलंबायचे ठरविले असून, हा कायदा दूर करणे हेच माझे एकमेव लक्ष्य असल्याचेही शर्मिला यांनी सांगितले.

इम्फाळ : मणिपूरमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांहून अधिक असली, तरी उमेदवारांच्या यादीमध्ये महिलांची संख्या तुरळक असल्याचे निदर्शनास आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला आहे.

मणिपूरमध्ये एकूण 19 लाख मतदार असून, यात निम्म्याहून अधिक महिला आहेत. येथील समाजामध्येही महिलांचे स्थान महत्त्वाचे असते. उमेदवारी देताना मात्र राजकीय पक्षांनी अत्यंत कमी प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व दिले आहे.

राज्यातील प्रमुख प्रबळ पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी केवळ दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. राज्यात 24 उमेदवार जाहीर केलेल्या तृणमूल कॉंग्रेसनेही दोनच महिलांना तिकीट दिले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा "प्रजा' हा पक्ष तीन जागांवर निवडणूक लढविणार आहे. यापैकी दोन जागांवर शर्मिला याच लढणार असून, तिसऱ्या जागेवरही महिलाच उमेदवार आहे. नॅशनल पीपल्स पक्षानेही जाहीर केलेल्या 21 उमेदवारांपैकी एकच महिला आहे.

महिला उमेदवारांचे प्रमाण कमी असल्याबाबत पक्षांकडे विचारणा केली असता, महिलाच निवडणूक लढण्यास फारशा उत्सुक नसल्याचा दावा कॉंग्रेस आणि भाजपने केला आहे. "प्रजा' पक्षाला मात्र हा दावा मान्य नसून, या दोन्ही मोठ्या पक्षांना महिला सबलीकरणात रस नसल्याची टीका त्यांनी केली आहे. तृणमूल कॉंग्रेसने मात्र येथील हिंसक राजकारणामुळे महिलांना अधिक प्रमाणात उमेदवारी दिली नसल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of women candidates neglisible