देशविदेशांतील पाहुण्यांमुळे पाटणा गजबजले

गुरुवार, 5 जानेवारी 2017

पाटण्यात प्रकाशवर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, बाहेरून आलेले शेकडो शीखधर्मीय गुरुवाणी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये चोवीस तास गुरुवाणीचे पठण केले जात आहे

पाटणा - शीख धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांचे साडेतीनशेवे प्रकाशवर्ष आणि बोधगया येथे सुरू असलेली कालचक्र पूजा या धार्मिक उत्सवांमुळे बिहारची राजधानी पाटणा देशविदेशांतील परकीय पाहुण्यांच्या आगमनामुळे अक्षरश: गजबजून गेली आहे. प्रकाशोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी देशविदेशांतील पाच लाखांपेक्षाही अधिक भाविक पाटण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कालचक्र पूजेमध्ये सहभागी होण्यासाठी येथे आलेल्या भूतानच्या राजमाता आंसी दोर्जी बांगो म्हणाल्या, की हा खरोखरच अद्‌भुत देखावा असून भगवान बुद्धांचा संदेशही आमच्या सोबत आहे. बांगो यांनी बौद्ध स्तूप असलेल्या चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया या स्थळालाही भेट दिली. सम्राट अशोकाने हा स्तूप उभारला होता. वैशालीहून कुशीनगरला जाताना महात्मा बुद्ध हे एक रात्र केसरियामध्ये थांबले होते. त्यांनी लिच्छवींना भिक्षापात्रही दिले होते. मलेशिया, थायलंडमधील अनेक बौद्ध बांधव केसरियामध्ये दाखल झाले आहेत.

प्रकाशवर्षानिमित्त कार्यक्रम
पाटण्यात प्रकाशवर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, बाहेरून आलेले शेकडो शीखधर्मीय गुरुवाणी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये चोवीस तास गुरुवाणीचे पठण केले जात आहे. गांधी मैदान ते पाटणा साहिबपर्यंतचा दहा किलोमीटरच्या परिसरात भव्य रोषणाई करण्यात आली असून, बहुतांश ठिकाणचे लंगर हे चोवीस तास सुरू ठेवण्यात आले आहेत. विविध राज्यांमधून आलेल्या भविकांची ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे.

नेत्यांची मांदियाळी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबमधील कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग हे पाटण्यात दाखल झाले आहेत. प्रकाशवर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी करण्यात आलेली व्यवस्था उत्तम असल्याचे प्रशस्तिपत्र या दोन नेत्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. अमरिंदरसिंग यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंजाबमधील प्रचारात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हेदेखील धार्मिक कार्यक्रमांत सहभागी झाले आहेत.

Web Title: Numerous foreign tourists in Bihar