नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती यांनी घेतली खासदारकीची शपथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

- नुसरत जहाँ लग्न करून परतल्या भारतात.

- भारतात परतल्यानंतर त्यांनी घेतली खासदारकीची शपथ. 

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या नवनियुक्त खासदार नुसरत जहाँ रुही आणि मिमी चक्रवर्ती यांनी आज (मंगळवार) लोकसभेत हजेरी लावली. त्यानंतर त्यांना 17 व्या लोकसभेच्या खासदारकीची शपथ देण्यात आली.

लोकसभेत नवनियुक्त खासदारांना शपथ देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या दोघीही हजर नव्हत्या. नुसरत जहाँ यांचा विवाह उद्योजक निखिल जैन यांच्याशी नुकताच तुर्के येथे झाला. नुसरत जहाँ यांच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मैत्रिण खासदार मिमी चक्रवर्तीही तुर्के येथे गेल्या होत्या. त्यामुळे या दोन खासदारांचा शपथविधी झाला नव्हता. त्यानंतर आज ते संसदेत परतल्यानंतर त्यांना खासदारकीची शपथ देण्यात आली. नुसरत जहाँ लोकसभेत आल्या तेव्हा त्यांच्या हातात बांगड्या, पांढऱ्या-जांभळ्या रंगाची साडी, अशा वेशात त्यांची लोकसभेतील एंट्री चांगलीच गाजली.

दरम्यान, नुसरत जहाँ या पश्चिम बंगालच्या बसिरहाट तर मिमी चक्रवर्ती या जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी शपथविधीवेळी 'वंदे मातरम्', 'जय हिंद', 'जय बंगाल'च्या घोषणा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nusrat Jahan Mimi Chakraborty from TMC take oath as Lok Sabha members