Loksabha 2019 : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का!

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

अल्पेश ठाकोर काँग्रेसचा 'हात' सोडणार आणि भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, गेल्या मार्च महिन्यात अल्पेश ठाकोर यांनी यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. त्यावेळी अल्पेश ठाकोर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहून पार्टीला पाठिंबा देणार आहे आणि समाजाच्या हक्कासाठी लढणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांचे सहकारी धवलसिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. ठाकोर समाजाच्या मागण्यांकडे पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाकोर सेना समितीने हा ठराव मंजूर केला आहे. सध्या तरी कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही, असेही धवलसिंह झाला यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचा हात सोडल्यानंतर अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यापूर्वी काँग्रेस आमदार हकुभा जडेजा यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना देखील मंत्रीपद दिले गेले होते.

Web Title: OBC Leader Alpesh Thakor Quits Congress Ahead of Lok Sabha Elections