गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका; मोदींचा तगडा विरोधकच भाजपमध्ये?

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 मार्च 2019

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर अल्पेश ठाकूर यांना मंत्रीपद देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

लोकसभा 2019 : अहमदाबाद- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर अल्पेश ठाकूर यांना मंत्रीपद देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांदरम्यान अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी या तिकडीनं खरंतर भाजपला मोठे आव्हान दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षानं दुर्लक्षित केल्याचा आरोप अल्पेश ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे नाराज अल्पेश ठाकूर भाजपचा 'हात' पकडण्याची शक्यता आहे. यापूर्वी काँग्रेस आमदार हकुभा जडेजा यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना देखील मंत्रीपद देण्यात आले होते. त्यानंतर 2017मध्ये हकुभा जडेजा भाजपच्या तिकीटावर जिंकून आले होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपने पक्ष मजबूत करण्यावर भर दिला असून 2019मध्ये केंद्रात सत्ता आणण्यासाठी देखील भाजपला 2014 प्रमाणे गुजरातमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी जातीय राजकारण देखील महत्त्वाचा भाग असणार आहे आणि अल्पेश ठाकूर हे ओबीसी नेते असल्याने भाजपला महत्वाचे वाटत आहेत. त्याचबरोबर त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर उभे केलेल्या आव्हानाची भाजपला कल्पना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obc leader alpesh thakur likely to enter in bjp in gujrat