
Global Family Day 2023 : एकत्र कुटुंब ठरतोय अक्षय आनंदाचा ठेवा
सोलापूर : आजच्या गतीमान अन् धकाधकीच्या काळात विभक्त कुटुंब पध्दतीचे दोष उघडे पडत असताना त्या तुलनेत एकत्र कुटुंब पध्दतीचे फायदे अधिक ठळकपणे समोर येत आहेत. एकत्रित खर्चाचे नियोजन,
अधिक उत्पन्न स्त्रोतासोबत मुलांचे खेळीमेळीत संगोपन, कामाच्या विभागणीमुळे महिलांवरील कामाचा कमी झालेला ताण यामुळे एकत्र कुटुंबातील सदस्यांना मिळणाऱ्या प्रगतीच्या संधी हे लाभ अधिक मोलाचे आहेत. जागतिक एकत्र कुटुंब दिनाच्या निमित्ताने, एकत्र कुटुंबाच्या प्रतिनिधींनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये त्यांचे मांडलेले अनुभव.
आनंद व प्रगतीचा मूलमंत्र
आमच्या एकत्र कुटुंबाची पायाभरणी आई-वडिलांनी केली. आई-वडिलांसह आम्हा पाच भावांचा परिवार विकसित होत गेला. एकत्र कुटुंबामुळे मानसिक आधार, आर्थिक प्रगती हे सर्व लाभ होत राहिले. ‘खर्च एकाच घराचा पण उत्पन्न सर्वांचे’ यामुळे ताण न घेता प्रगती होत राहते.
मुले तर संगोपनाशिवाय सहज एकमेंकासोबत राहून वाढली. सगळ्यांना व्यवसाय व काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. तसेच मुलांच्या करिअरबद्दल मार्गदर्शनातून ते विकसित झाले. आईने सर्वच सुनांचा लेकीप्रमाणे सांभाळल्याने कुटुंब सशक्त होत गेले.
प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही उत्पन्न स्रोत कायम करण्याचे नियोजन वडिलांनी केले. कोणत्याही स्थितीत मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने विभक्त कुटुंबाच्या समस्या आम्ही अनुभवल्याच नाहीत. कामाच्या विभागणीमुळे महिलांना देखील त्याचा लाभ झाला. आता आमची एकूण चौदा अपत्ये असून त्यातील तीन मुलींची लग्ने झाली आहेत. एक नातसून आम्हाला आली आहे.
- विनोद गांधी, भारतनगर, मजरेवाडी, सोलापूर
एकत्र कुटुंबाच्या आनंदाला नाही तोटा
आमच्या कुटुंबात एकूण ७२ सदस्य आहेत. धान्याची व किराणाची होलसेल खरेदी होते. सर्व मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे नोकरी व व्यवसायात करिअरचे स्वातंत्र्य दिले. घरात महिलांना एक दिवस काम तर दोन दिवस सुटी असा आनंद कामाच्या विभागणीने मिळतो. मुलांच्या संगोपनात शेअरिंग व केअरिंग’ आपोआपच होते.
घरात पाच वर्षापासून २८ वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुले आहेत. परिवारामधील एक काका लग्नांची कामे पाहतात. गणेशोत्सव व दिवाळीला आम्ही सारे एकत्र येतो. घरातील महिलांना छंद व आवडी जोपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. लग्नाच्या आधी सुनांना आलेला ताण कामाची विभागणीने संपल्याच आनंद अनुभवता येतो.
- आश्विन डोईजोडे, टिळक चौक, सोलापूर
एकत्र कुटुंबामुळे ‘कीर्ती’चा विश्वविक्रम
एकत्र कुटुंबात सर्वांनी सामंजस्याने वागायला हवे. रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कुटुंब प्रमुखाच्या आज्ञांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. सर्वांनी शिस्त पालन केल्यास अनेक दिवस कुटुंब एकत्र पद्धतीने राहू शकते. एकत्र कुटुंबात आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे करणे महत्त्वाचे असते. प्रामुख्याने शिक्षण व आरेाग्याच्या सुविधांसाठी मोठा खर्च होणार असल्याने चैनीच्या व सुखसुविधांच्या गोष्टीवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे.
अनावश्यक खर्चाला कात्री लावल्यास आर्थिक नियोजन करणे शक्य होते. एकत्र कुटुंबामुळे लहान मुलांवर उत्तम संस्कार होतात. कोणतीही समस्या कुटुंबासमोर आल्यास सोडविण्यासाठी सर्वजण समर्थ असतात, पुढील पिढी सक्षम तयार होते. आमच्या घरात तीन भाऊ व तिघांची सात मुले, सुना एकत्र राहतात. या एकत्रित कुटुंबाच्या प्रोत्सहानामुळे आमची मुलगी कीर्ती भराडिया ही विश्व विक्रम करू शकली.
- नंदकिशोर भराडिया, अध्यक्ष, दमाणी विद्यामंदिर, सोलापूर
ज्येष्ठांचा प्रेमाचा अंकुश असावा
कटुंब एकत्रित राहण्यासाठी सर्वांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे. घरातील कुणीही एखादा निर्णय घेतल्यास त्याला सर्वांना सपोर्ट करणे आवश्यक आहे. केवळ कुटुंब एकत्र असून चालत नाही कटुंबात एकजूट पाहिजे, एकमत पाहिजे, हे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वांचा एकमेकांवर विश्वास असल्यास बाहेरच्या माणसाचा सल्ला घेण्याची गरज पडत नाही. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी कुटुंबातीलच व्यक्ती सक्षम असतात.
सहसा बाहेरील व्यक्तींकडून मध्यस्ती करण्याची गरज नसावी. कटुंबातच सल्लामसलत होणे आवश्यक आहे. आमच्या वडीलांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले. घरातील प्रत्येकजणाला सक्षम केले. प्रत्येकजण दिवसभर प्रत्येकाच्या कामात असला तर किमान रात्री सर्वांनी एकत्रित येऊन भोजन घेतले पाहिजे. घरातील ज्येष्ठांचा कनिष्ठांवर प्रेमाचा अंकुश असणे आवश्यक आहे.
- जयंत दर्बी, कपड्याचे व्यापारी.