इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारी करतेय मनरेगामध्ये रोजंदारी; फी भरता न आल्याने शिक्षण अर्धवट;

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

शिक्षणाची फी भरु न शकलेल्या कॉलेजने तिचा डिप्लोमा थांबवला आहे.

भुवनेश्वर : पापी पोट माणसाला काय काय करायला लावतं. या उक्तीचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं अशी ही ओडीसाच्या रोजीची गोष्ट. रोजीने आपल्या जिद्द आणि चिकाटीने इंजिनिअरींगचं शिक्षण तर पूर्ण केलं. मात्र शिक्षणाची फी भरु न शकलेल्या कॉलेजने तिचा डिप्लोमा थांबवला आहे. आता तिला रोजंदारीवर काम करावं लागत आहे. ती दररोज 207 रुपयांसाठी मनरेगाची कामगार म्हणून काम करत आहे. जेणेकरुन डिप्लोमा मिळवण्यासाठी ती पैसे कमावू शकेल. तिला आपली फि भरण्यासाठी 44,000 रुपयांची आवश्यकता आहे.

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे ओडीसा राज्यातील पुरी जिल्ह्यातील गोराडापिढा गावातील. या गावात रोजीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र फि न देऊ शकल्याने तिच्या आयुष्यात एक मोठं संकट उभं राहिलं आहे. या कारणाने तिच्या कॉलेजने तिला डिप्लोमा देण्यास नकार दिला आहे. आता ती आपल्या वडिलांसोबत मनरेगाची कामगार म्हणून काम करत आहे. जेणेकरुन ती आपलं घर चालवण्यास हातभार लावू शकेल तसेच आपलं शिक्षण चालू ठेवू शकेल आणि भविष्यात उज्वल करिअर करु शकेल. 

हेही वाचा - सरकारने डोळे का झाकलेत? काहीच का करत नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
2016-2019 दरम्यान इंजिनिअरिंगचं शिक्षण
रोजीने 2016-2019 च्या दरम्यान एका प्रायव्हेट कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तिने हा कोर्स सरकारी अनुदानाच्या मदतीने तिने पूर्ण केला. मात्र हॉस्टेलची फि भरण्यासाठी तिच्याजवळ पैसे नव्हते. त्यासाठी तिला 44,000 रुपयांची आवश्यकता आहे. तिने कॉलेज प्रशासनाला आपली अडचण सांगितली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता ती मनरेगा स्कीम अंतर्गत रोजंदारी करत आहे. जेणेकरुन पैसे साठवून तिला आपली डिग्री मिळवून पुढील शिक्षण करता येईल. 
रोजीला भीती आहे की सर्टीफिकेट मिळालं नाही तर तिला B.Tech मध्ये ऍडमिशन घेता येणार नाही. रोजीच्या घरी तिच्या पाच बहिणी आहेत. तर घरात फक्त वडील कमावते आहेत, जे रोजंदारी करतात. अशात घरखर्च भागवणेच मुश्किल होत असल्याने शिक्षणासाठी खर्च करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. यामुळेच तिने स्वत:च काम करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 20 दिवसांपासून ती मनरेगा स्कीमच्या अंतर्गत माती उचलण्याचे काम करत आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन खडबडून जागं झालं. देलांग ब्लॉगच्या वेल्फेअर एक्स्टेंशन ऑफिसरने म्हटलंय की ते या प्रकरणाची चौकशी करतील. त्यांनी रोजीची भेट घेतली तसेच तिचं म्हणणं देखील ऐकून घेतलं आहे.तिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आता तिला 30 हजार रुपयांची मदत देखील केली गेली आहे. तसेच ती तिचे भविष्यातील शिक्षण विनाअडचण पार पाडू शकेल यासाठी मदत देखील करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Odisha An engineering student Rosy Behera in Puri works as a daily wager to pay her college fees.