बियाणे खरेदीसाठी आता पाचशेच्या जुन्या नोटा

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, सरकारने आता बियाणे खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची सवलत त्यांना दिली आहे. ही सवलत केवळ केंद्र व राज्य सरकारी दुकाने आणि कृषी विद्यापीठांमध्ये असणार आहे.

केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्र, राष्ट्रीय व राज्य बियाणे महामंडळे, केंद्रीय व राज्य कृषी विद्यापीठे आणि इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च यांच्या दुकानांमधून शेतकऱ्यांना जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा देऊन बियाणे खरेदी करता येईल. यासाठी शेतकऱ्यांना सरकारी ओळखपत्राचा पुरावा सादर करावा लागेल. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

याआधी सरकारने शेतकऱ्यांना "केवायसी' पूर्ण असलेल्या बॅंक खात्यातून आठवड्याला कर्जातील 25 हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. याचबरोबर पीकविम्याच्या हप्ता जुन्या नोटांच्या स्वरूपात भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदणीकृत व्यापाऱ्यांना आठवड्याला 50 हजार रुपये काढण्याची सवलत दिली होती.

Web Title: old five hundred rupees currency for the purchase of seeds