जुन्या नोटा स्वीकारण्यास बॅंकांकडून अखेर सुरवात

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा जमा करण्याबाबतचा नियम मागे घेतल्यानंतर बॅंकांनी बुधवारी कोणत्याही चौकशीविना जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरवात केली.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा जमा करण्याबाबतचा नियम मागे घेतल्यानंतर बॅंकांनी बुधवारी कोणत्याही चौकशीविना जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरवात केली.

नोटाबंदी झाल्यानंतर जुन्या नोटा जमा करण्यास 30 डिसेंबरची अखेरची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास दहा दिवसांचा अवधी राहिला असून, बॅंकांमधील गर्दी ओसरण्याची चिन्हे नाहीत. रिझर्व्ह बॅंकेने काल पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या जुन्या नोटा जमा करणाऱ्यांकडून आधी नोटा जमा न करण्याचे कारण विचारण्याचे आदेश बॅंकांना दिले होते. यामुळे बॅंकांनी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नोटा स्वीकारणे बंद केले होते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या जुन्या नोटा जमा करणाऱ्या खातेदारांची चौकशी दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करणे बंधनकारक होते. बॅंकांतील गर्दी आणि मनुष्यबळाचा अभाव, यामुळे बॅंकांनी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक जुन्या नोटा स्वीकारणेच बंद केले होते.

आज रिझर्व्ह बॅंकेने हा नियम मागे घेऊन "केवायसी' असलेल्या खातेधारकांनी कितीही प्रमाणात जुन्या नोटा जमा केल्यास त्यांची चौकशी करण्यात येणार नाही, असे जाहीर केले. हा आदेश बॅंकांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी न येता कामकाज सुरू झाल्यानंतर आला. त्यानंतर बॅंकांनी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरवात केली.

Web Title: old notes accepted now