‘शांततेसाठी बहुपक्षीय व्यवस्था हवी’; ओम बिर्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Om Birla Statement

‘शांततेसाठी बहुपक्षीय व्यवस्था हवी’; ओम बिर्ला

नवी दिल्ली : भारताने नियमाधारीत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची नेहमीच पाठराखण केली असून वैश्विक शांतता आणि स्थैर्यासाठी बहुपक्षीय व्यवस्था स्विकारली जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. समावेशक विकासासाठी संघर्ष नव्हे तर संवाद हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

जाकार्ता (इंडोनेशिया) येथे जी-२० देशांच्या संसद अध्यक्षांच्या शिखर परिषदेत बिर्ला भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ‘प्रभावी संसद, जिवंत लोकशाही‘ या विषयावर त्यांनी भाष्य केले. जी-२० देशांचे अध्यक्षपद भारताकडे येत आहे. या कालावधीत संघटनेतील सदस्य देशांदरम्यान एकजूट आणि सहकार्य वाढविण्यासाठी भारताची कटीबद्धता बिर्ला यांनी बोलून दाखविली. संसदीय प्रक्रियेमध्ये तरुणाईची सक्रीयता वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, "चिंतेचे विषय : अन्न आणि उर्जा सुरक्षा तसेच आर्थिक आव्हाने" या परिसंवादात बिर्ला यांनी, ‘कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता असल्याने जगासमोर अन्नधान्याचे तसेच उर्जा सुरक्षेचे संकट वाढले आहे,‘ याकडे लक्ष वेधले. या संघर्षावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढला जावा या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला अन्न सुरक्षा, उर्जा सुरक्षा, पर्यावरण बदल आणि शाश्वत विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपापल्या सरकारचे लक्ष वेधण्याची जबाबदारी संसदेची आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

याआधी परिषदेच्या उद्घाटनपर सत्रामध्ये संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांचा संदेश चित्रफितीद्वारे प्रसारीत करण्यात आला. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो, अंतर-संसद संघाचे अध्यक्ष डुआर्टे पाचेको, इंडोनेशियाच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष डॉ. पुआन महारानी तसेच ‘जी-२०‘ समुहातील देशांचे संसद अध्यक्ष सहभागी झाले होते.

टॅग्स :IndiaDevelopment