लोकशाहीचे हे नवे रुप : उमर

पीटीआय
Monday, 15 February 2021

जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उमर यांनी त्यांच्या घराबाहेरील पोलिस गाड्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली. पोलिसांनी आपल्या घरात काम करणाऱ्यांनाही येऊ दिले नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

श्रीनगर - आपले वडील खासदार फारूख अब्दुल्ला यांच्यासह आपल्याला आणि इतर कुटुंबीयांना सरकारने स्थानबद्धतेत ठेवले असल्याचा दावा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र, पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण होत असल्यामुळे विशेष व्यक्तींना आज बाहेर न पडण्याचा ‘सल्ला’ देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उमर अब्दुल्ला यांनी ट्वीटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. ‘ऑगस्ट २०१९ नंतरचा हा नवा काश्‍मीर आहे. कोणतेही कारण न देता आम्हाला घरात कैद करून ठेवले आहे. विद्यमान खासदार असलेल्या माझ्या वडिलांनाही त्यांनी घरातच बंदिस्त केले आहे, हे सर्वांत वाईट आहे. याशिवाय माझी बहिण आणि तिच्या मुलांनाही स्थानबद्धतेत ठेवले आहे,’ असे उमर यांनी सांगितले. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उमर यांनी त्यांच्या घराबाहेरील पोलिस गाड्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली. पोलिसांनी आपल्या घरात काम करणाऱ्यांनाही येऊ दिले नाही, अशी तक्रार त्यांनी केली. पोलिसांनी स्पष्टीकरण दिल्यावरही उमर यांनी, तुम्ही कोणत्या कायद्याअंतर्गत आम्हाला स्थानबद्ध केले ते सांगा, असे आवाहन केले. तुम्ही मला बाहेर न पडण्याचा सल्ला देऊ शकता, मात्र बळजबरीने घरात डांबू शकत नाहीत, असे उमर यांनी सुनावले. पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही प्रशासनाने स्थानबद्धतेत ठेवल्याचा दावा केला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोकशाहीचे नवे रुप म्हणजे तुम्हाला कोणतेही कारण न देता घरात डांबून ठेवले जाते. त्याहून अधिक म्हणजे घरात कामासाठी येणाऱ्यांनाही प्रवेश नाकारला जातो. आणि तरीही मी राग व्यक्त केला तर तुम्हाला आश्‍चर्य वाटते.
- उमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omar Abdullah leader of the National Conference new form of democracy

Tags
टॉपिकस
Topic Tags: