गेल्या वर्षात एक कोटी रोजगार उपलब्ध : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कोणतेही कारण असो, मॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा आहे. या अशाप्रकारच्या घटना समोर येत असल्याने अंत्यत दु:ख होत आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता त्यांनी मागील वर्षात एक कोटी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी आज (रविवार) केला.

'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी जीएसटी, रोजगार, देशातील राजकीय वातावरण यांसह विविध विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीत त्यांना रोजगाराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले, की देशात मागील वर्षभरात एक कोटी बरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेरोजगारांना सध्या नोकऱ्या मिळत आहे. त्यामुळे देशातील तरुणांना नोकरी मिळत नसल्याचा प्रचार आता बंद केला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.  

मॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा : पंतप्रधान

जमावाकडून होत असलेल्या हिंसाचार आणि गोरक्षणाच्या मुद्दावरही पंतप्रधान मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले, कोणतेही कारण असो मॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा आहे. या अशाप्रकारच्या घटना समोर येत असल्याने अंत्यत दु:ख होत आहे.

राज्य सरकारने यांसारख्या घटना कशा नियंत्रित करता येऊ शकतील, याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करायला हव्यात. कोणताही धर्म, जातीतील व्यक्ती असो त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या मुद्यावर नव्या शिफारसी देण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची समितीही स्थापना केली आहे. मंत्र्यांची ही समिती शिफारशींवर लक्ष देईल. 

Web Title: One crore jobs available last year says PM Modi