'ते' होते केवळ एक दिवसासाठी मुख्यमंत्री !

शनिवार, 19 मे 2018

उत्तरप्रदेशमध्ये याआधीही असाच प्रकार एकदा घडलेला आहे. तेथील काँग्रेस पक्षाचे जगदंबिका पाल हे अवघ्या एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाले होते. शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

बंगळूर : येडियुरप्पा कर्नाटकचे 23वे मुख्यमंत्री बनले खरे परंतु, अवघ्या दोन दिवसांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. याआधीही पहिल्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर केवळ सात दिवसच ते मुख्यमंत्री पदावर राहिले होते. यानंतर पुन्हा मुख्यमंपदी विराजमान झाल्यावर मात्र त्यांनी तीन वर्षे हे पद भुषविले होते. यावेळेस मात्र केवळ 55 तासात त्यांना मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार व्हावे लागले आहे. कर्नाटकमधील राजकीय उलथापालथीनंतर त्यांनी आज (शनिवारी) दुपारी राजीनामा दिला.

उत्तरप्रदेशमध्ये याआधीही असाच प्रकार एकदा घडलेला आहे. तेथील काँग्रेस पक्षाचे जगदंबिका पाल हे अवघ्या एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाले होते. शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

1996 मध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्यावेळी असाच अस्पष्ट जनादेश आला होता. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. कोणताही एक पक्ष सरकार स्थापन करु शकत नव्हता. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आणि याचवेळी बसपा आणि भाजप यांच्यात युती होऊन कल्याणसिंह मुख्यमंत्री बनले. ही सरकारही जास्त काळ टिकू शकली नाही. पुन्हा कल्याणसिंह यांनी तडजोड करुन सरकार बनवले. परंतु, 21 फेब्रुवारी 1998 रोजी राज्यपाल भंडारी यांनी जगदंबिका पाल यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले. त्यावेळी जगदंबिका पाल काँग्रेसमध्ये होते. परंतु, पुढच्याच दिवशी राज्यपालांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि उच्च न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय बदलला. यानंतर जगदंबिका पाल यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि कल्याण सिंह परत मुख्यमंत्री बनले. जगदंबिका पाल यांचे सरकार एक दिवसही टिकू शकले नाही.

Web Title: one day chief minister in india