काश्‍मीर:तीन आठवड्यांत चौथा हल्ला; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

राज्यात गेल्या तीन आठवड्यांत दहशतवाद्यांनी लष्करास लक्ष्य केल्याची ही चौथी मोठी घटना आहे. याआधीच्या तीन हल्ल्यांत एका मेजर व पाच जवान हुतात्मा झाले आहेत

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यामधील शोपियां जिल्ह्यामध्ये आज (गुरुवार) पहाटे दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. या हल्ल्यात एका महिलेसही मृत्यु आला. याचबरोबर, लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जण दहशतवाद्यांनी अचानक चढविलेल्या या हल्ल्यात जखमी झाले. यांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने श्रीनगर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी अधिक कुमकही पाठविण्यात आली आहे.

लष्कराने दहशतवाद्यांना तातडीने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत निसटून जाण्यात यश मिळविले. लष्कराचे हे पथक जिल्ह्यातील कुंगरु गावामधील एक शोध मोहिम संपवून परतत असताना दहशतवाद्‌यांनी हा हल्ला चढविला.

राज्यात गेल्या तीन आठवड्यांत दहशतवाद्यांनी लष्करास लक्ष्य केल्याची ही चौथी मोठी घटना आहे. याआधीच्या तीन हल्ल्यांत एका मेजर व पाच जवान हुतात्मा झाले आहेत.

Web Title: One jawan martyred, six injured in militant ambush in Kashmir’s Shopian