निपाणीजवळ मोटार अपघातात विटा येथील एक ठार

अमोल नागराळे
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

निपाणी - राष्ट्रीय महामार्गावरील स्तवनिधी (ता. निपाणी) येथे मोटार अपघातात एकजण ठार तर चारजण जखमी झाले. जयेंद्र रवींद्र लिमये (वय 30) असे मृताचे नाव आहे.

निपाणी - राष्ट्रीय महामार्गावरील स्तवनिधी (ता. निपाणी) येथे मोटार अपघातात एकजण ठार तर चारजण जखमी झाले. जयेंद्र रवींद्र लिमये (वय 30) असे मृताचे नाव आहे. विद्याधर कुलकर्णी (32), विकास रत्नाकर जोग (44), महेश मुकुंद इनामदार (27), तेजस दत्तात्रय कुलकर्णी (31) अशी जखमींची नावे आहेत. सर्वजण रा. शाहुनगर, विटा. जि. सांगली येथील आहेत. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली आहे. 

याबद्दल माहिती अशी, जयेंद्र यांच्यासह सर्वजण मिळून मोटारीने (एमएच 10 सीए 5714) गोव्याला गेले होते. सोमवारी (ता. 17) रात्री उशीरा ते गोव्याहून विटयाच्या दिशेने निघाले होते. मंगळवारी (ता. 18) सकाळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील स्तवनिधी घाटाच्या खाली पायथ्याला चिंदीपीर दर्ग्याजवळ आल्यावर चालक विद्याधर कुलकर्णी यांचा मोटारीवरील अचानक ताबा सुटल्याने मोटार महामार्गाच्या बाजूला झाडावर जाऊन आदळली. त्यात जयेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्याधर, विकास, महेश, तेजस यांना छातीला व कंबरेला मुक्कामार लागला. 

घटनास्थळी हायवे पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांसह शहर पोलिसांनी भेट देऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले. सर्व जखमींना त्वरीत कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत जयेंद्र यांच्या मृतदेहाचे महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शहर पोलिस उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

Web Title: One killed in motor car crash near Nipani