तोंडी तलाकविरुद्धच्या याचिकेवर 10 लाख मुस्लिमांची स्वाक्षरी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने तोंडी तलाकला विरोध दर्शविण्यासाठी एक याचिका तयार केली आहे. तसेच या याचिकेवर स्वाक्षरीची मोहिमही सुरू केली आहे. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत दहा लाख मुस्लिमांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्ली - मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीला विरोध करण्यासाठीच्या एका याचिकेतर भारतातील दहा लाख मुस्लिम नागरिकांनी स्वाक्षरी करून या पद्धतीला विरोध दर्शविला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने तोंडी तलाकला विरोध दर्शविण्यासाठी एक याचिका तयार केली आहे. या याचिकेवर स्वाक्षरीची मोहिमही सुरू केली आहे. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत दहा लाख मुस्लिमांनी त्यावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा या याचिकेसोबत संबंध जोडण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधील एकूण लोकसंख्येपैकी 18.5 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे.

काही महिलांनीही सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकपद्धत रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनेही ही पद्धत लैंगिक भेदभाव करणारी आणि अन्यायकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तर ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाने या पद्धतीचे समर्थन करत एखाद्या महिलेला ठार करण्यापेक्षा ही पद्धत चांगली असल्यचा दावा केला आहे. धर्माने दिलेले अधिकार कायद्याचे न्यायालय रद्द करू शकत नाही, असेही लॉ बोर्डाने म्हटले आहे. तर "मुस्लिम महिलांचे आयुष्य तोंडी तलाकपद्धतीमुळे उध्वस्त होऊ दिले जाणार नाही', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पद्धतीला विरोध दर्शविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One million indian muslims sign petition against triple talaq