गो-तस्करीच्या संशयातून जमावाकडून एकाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

राजस्थानातील अलवर जिल्ह्यात गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जमावाकडून होणारे हल्ले आणि हत्यांचे सत्र अद्यापही सुरू असून, त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. अकबर खान (वय 28) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेली दुसरी व्यक्ती जमावाने हल्ला केल्यानंतर सुटका करून घेण्यात यशस्वी ठरला, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जयपूर- राजस्थानातील अलवर जिल्ह्यात गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जमावाकडून होणारे हल्ले आणि हत्यांचे सत्र अद्यापही सुरू असून, त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. अकबर खान (वय 28) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेली दुसरी व्यक्ती जमावाने हल्ला केल्यानंतर सुटका करून घेण्यात यशस्वी ठरला, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले अकबर खान आणि त्यांचे एक मित्र हरियानातील आपल्या गावाकडे दोन गाईंना घेऊन जात होते. अलवर जिल्ह्यातील ललवांडी जवळच्या जंगलातून जात असताना जमावाने खान आणि त्यांच्या मित्रावर हल्ला करत मारहाण सुरू केली. गाईंची तस्करी केली जात असल्याच्या संशयातून खान यांना मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गाईंच्या तस्करीच्या दाव्याची अद्याप पडताळणी करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

जमावाकडून झालेल्या मारहाणीमध्ये खान हे गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी खान यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. खान यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात आला असून, त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

ही घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतरही अशा प्रकारच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी केला. ""जमावाकडून झालेल्या मारहाणीमध्ये अकबर खान यांच्या झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना असून, या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल,'' अशी प्रतिक्रिया राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी व्यक्त केली.

Web Title: One murdered by the mob in rajasthan