‘हिडकल’मधून कृष्णा नदीत १ टीएमसी पाणी

‘हिडकल’मधून कृष्णा नदीत १ टीएमसी पाणी

बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून चिक्‍कोडीपर्यंत जाणार असून केवळ कृष्णेचे पात्र ओले होणार आहे. परिणामी, नागरिकांची तहान भागणे कठीण आहे.

सोमवार (ता. २०) पासून हिडकल जलाशयातून कृष्णेला १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. प्रथमच असा निर्णय शासनाने घेतला असून घटप्रभा डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांचा यासाठी वापर केला जाणार आहे.

सोमवारपासून पहिले तीन दिवस ३ हजार क्‍यूसेस पाणी कालव्यातून कृष्णेकडे सोडले जाईल. त्यानंतर पुढील चार दिवस १ हजार क्‍यूसेस पाणी हिडकलमधून सोडले जाणार आहे. हिडकल जलाशयातून घटप्रभा डाव्या कालव्याद्वारे २२ किलोमीटर दूर असलेल्या धुपदाळला पाणी पोचणार आहे. तेथून ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुगळखोड वितरण केंद्रातून पुढे हिरेहळ्ळीमार्गे पुन्हा २२ किलोमीटर अंतर पार करीत अथणी तालुक्‍यातील शेगुणसी येथे कृष्णा नदीत पाणी पोचेल. हे सर्व कालवे कोरडे पडले असून हिडकल जलाशयाचे पाणी कृष्णेला पोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

दरम्यान, हिडकलचे पाणी कृष्णेपर्यंत पोचण्यात अनेक अडथळे आहेत. आधीच सर्व कालवे कोरडे असून जमीन पाणी खेचणार आहे. त्यातच या कालव्यांच्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी पंपसेट बसविले आहेत. कालव्यामध्ये पाणी येताच शेतकऱ्यांकडून ते पंपसेटद्वारे शेतात सोडले जाण्याची अधिक शक्‍यता आहे. यासाठी प्रादेशिक आयुक्तांनी हेस्कॉम आणि महसूल खात्याला आधीच सूचना दिली आहे. पाणी सोडण्याच्या कालावधीत या मार्गावरील सर्व वीज कनेक्‍शन बंद ठेवले जाणार आहेत. यासह कालव्याच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असून शेतीसाठी हे पाणी वापरता येणार नाही. केवळ लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. 

डेड स्टोअरेजचे पाणी शिल्लक
हिडकल जलाशयात ४ टीएमसी पाणीसाठा आहे. यापूर्वीच ठरल्याप्रमाणे बागलकोट आणि मुधोळ तालुक्‍यांना २४ मेपासून २.१ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. बेळगाव, संकेश्‍वर, हुक्केरी शहरांना हिडकल जलाशयातून पिण्याचे पाणी दिले जाते. त्यासाठी १ टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. त्यातच चिक्‍कोडीसाठी कृष्णा नदीला या जलाशयातून १ टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याने हिडकल जलाशयात केवळ डेड स्टोअरेजचे पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे जून महिन्यात केवळ पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com