अटी मान्य असतील तरच चर्चेला बसू- ओ. पनीरसेल्वम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

चेन्नई: तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते ओ.पनीरसेल्वम यांनी अण्णा द्रमुकमध्ये आपला गट विलीन करण्यासाठी विद्यमान नेतृत्वाला काही अटी घातल्या आहेत. या अटी मान्य असतील तरच चर्चेला बसू, असा स्पष्ट इशारा पनीरसेल्वम गटाकडून विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना देण्यात आला आहे.

चेन्नई: तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते ओ.पनीरसेल्वम यांनी अण्णा द्रमुकमध्ये आपला गट विलीन करण्यासाठी विद्यमान नेतृत्वाला काही अटी घातल्या आहेत. या अटी मान्य असतील तरच चर्चेला बसू, असा स्पष्ट इशारा पनीरसेल्वम गटाकडून विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना देण्यात आला आहे.

सध्या अण्णा द्रमुकने निवडणूक आयोगाला सादर कलेले शपथपत्र मागे घ्यावे, यात व्ही. के. शशिकला यांचा पक्षाच्या सरचिटणीस, तर दिनाकरन यांचा उपसरचिटणीस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. दिवंगत नेत्या जयललिता यांच्या संशयास्पद मृत्यूची "सीबीआय'च्या माध्यमातून चौकशी केली जावी, तशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे करावी, अशा या दोन अटी आहेत. पनीरसेल्वम गटाचे नेते के. पी. मुनूस्वामी यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. तत्पूर्वी लोकसभेचे उपाध्यक्ष आणि अण्णा द्रमुकचे नेते एम. थंबीदुराई यांनी भविष्यामध्ये पलानीस्वामी हेच मुख्यमंत्री राहतील, असे म्हटले होते, तर डी. जयकुमार यांनीही पनीरसेल्वम यांच्या दबावामुळे दिनाकरन यांची हकालपट्टी केल्याचा आरोप फेटाळून लावला होता. पनीरसेल्वम उद्या आपल्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प निवडून आले होते, असा दावा करतील, असे विधान अर्थमंत्री डी. जयकुमार यांनी केल्याने पनीरसेल्वम यांचा गट दुखावला होता. या घडामोडीनंतर अण्णा द्रमुकमध्ये नव्याने चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

चर्चेसाठी समिती
पलानीस्वामी यांचा गट पनीरसेल्वम यांच्या गटाशी विनाअट चर्चेला तयार असून, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. आमच्याकडून तरी चर्चेसाठी कोणतीही पूर्वअट घालण्यात आलेली नाही, असे राज्यसभेचे सदस्य आर. वैथिलिंगम यांनी स्पष्ट केले. दरम्यान पनीरसेल्वम अण्णा द्रमुकमध्ये आले तर त्यांचे पारडे जड होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: Only if the conditions are agreed - o'panneerselvam