अविवाहित मुलींनाच महाविद्यालयात प्रवेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

तेलंगण सरकारचा अजब आदेश

हैदराबाद:  "तेलंगण सोशल वेलफेअर रेसिडेंशियल वुमेन्स कॉलेज' या निवासी महाविद्यालयात केवळ अविवाहित मुलीच शिक्षण घेण्यास पात्र ठरतील, असा अजब आदेश येथील राज्य सरकारने काढला आहे.

तेलंगण सरकारचा अजब आदेश

हैदराबाद:  "तेलंगण सोशल वेलफेअर रेसिडेंशियल वुमेन्स कॉलेज' या निवासी महाविद्यालयात केवळ अविवाहित मुलीच शिक्षण घेण्यास पात्र ठरतील, असा अजब आदेश येथील राज्य सरकारने काढला आहे.

निवासी पदवी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी या महाविद्यालयाने जाहिरातीद्वारे अर्ज मागविले आहेत. त्यात म्हटले आहे की, "माध्यमिक परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविलेल्या व प्रवेश परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या अविवाहित मुलींकडून 2017-18 या शैक्षणिक वर्षात सुरू होणाऱ्या बी.ए./ बी.कॉम/ बीएस्सीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.' हा अभ्यासक्रम एक वर्ष किंवा सत्र पद्धतीवर आधारित असून, माध्यम इंग्रजी असेल असेही यात नमूद केले आहे. प्रवेश परीक्षा 14 एप्रिल 2017 रोजी होणार आहे. हा आदेश एक वर्षासाठी लागू आहे. या निवासी महाविद्यालयात सध्या चार हजार विद्यार्थिनी शिकत आहेत. तेलंगणात महिलांसाठी 23 निवासी महाविद्यालये आहेत. त्याची प्रवेश क्षमता प्रत्येकी 280 विद्यार्थिनींची आहे.

लक्ष विचलित होऊ नये म्हणून...
या प्रकाराबाबत बोलताना " जर पती भेटायला महाविद्यालयात आले तर विवाहित विद्यार्थिनींचे लक्ष विचलित होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी असा आदेश काढल्याचा दावा महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. विवाहित मुलींना प्रवेश देण्याचा उल्लेख नसला तरी, अशा ज्यांना शिक्षण घ्यायचे त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे संपर्क साधला तर त्यांना प्रवेशापासून रोखणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: only Single women college admission in telangana