मणिपूर भारतापासून स्वतंत्र?; लंडनमध्ये दोघांची पत्रकार परिषदेत घोषणा

टीम ई-सकाळ
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मणिपूरचे हे सरकारच हद्दपार सरकार असून, ते लंडनमधून चालवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लंडन : मणिपूरचे राजे लैशेंबा सनाजौबा यांनी मणिपूर स्टेट कौन्सिल भारतापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा लंडनमध्ये केली आहे. राजे लैशेंबा यांच्या दोन प्रतिनिधींनी लंडनमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत भारतापासून मणिपूरला स्वातंत्र्य मिळाल्याचा बॅनरही लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, केवळ दोघ व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन मणिपूर स्वतंत्र झाल्याची घोषणा केल्याने हा प्रकार हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्रात पुन्हा युतीचा 1995 पॅटर्न?

मणिपूर स्टेक कौन्सिलचे मुख्यमंत्री यामबेन बिरेन, कौन्सिलचे परराष्ट्र आणि संरक्षण खात्याचे मंत्री नारेंगबाम समरजीत यांनी ही पत्रकार परिषद घेतली. मणिपूरचे महामहीम राजे लैशेंबा सनाजौबा यांच्यावतीने ही घोषणा करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मणिपूरचे हे सरकार हद्दपार सरकार असून, ते लंडनमधून चालवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मणिपूरमधील राजकीय परिस्थिती दुरुस्त करताना 15 मार्च 2013 रोजी देण्यात आलेल्या आदेश क्रमांक 12 नुसार त्यांना राजे लैशेंबा यांनी विशेष अधिकार दिले आहेत. दोन्ही नेत्यांनी सप्टेंबर 2019पासून लंडनमध्ये आश्रय घेतल्याचीही माहिती दिली. भारतीय लष्कराकडून अटक होऊन त्यांना जीवे मारण्याची शक्यता असल्याने त्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात सत्तेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी खुली केली दारे

दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपली स्थिती जाहीर करण्यासाठी आणि मणिपूर स्वतंत्र असल्याची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही आजपासून संयुक्त राष्ट्र सदस्यांना आवाहन करतो की त्यांनी मणिपूरच्या या हद्दपार सरकारच्या सार्वभौमत्वाला मान्यता द्यावी. 1958पासून लष्कराला मणिपूरमध्ये विशेष अधिकार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only two leaders from manipur announces separation from India