...असे आदेश न्यायालयाला द्यावे लागतात?

..असे आदेश न्यायालयाला द्यावे लागतात?
..असे आदेश न्यायालयाला द्यावे लागतात?

विवाहित मुलांनी पालकांच्या इच्छेविना घरात राहणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. खरं तर भारतासारख्या कुटुंबप्रधान आणि संस्कृतीप्रधान देशात असा आदेश न्यायालयाने द्यावा यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. खरे वास्तव तर यापेक्षा भयानक आहे. विवाहित मुलगा आणि त्याची बायको आई-वडिलांच्या घरात तर राहतातच शिवाय त्यांचा योग्यरित्या सांभाळही करत नसल्याचे चित्र आहे. ज्या देशात श्रावणबाळाच्या मातृपितृप्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जातात. "श्‍यामची आई'ची संस्कार कथा म्हणून सांगितली जाते. ज्या संस्कृतीत आई-वडिलांना सर्वोच्च स्थान देण्यात आलेले आहे. त्याच संस्कृतीत विवाहित झाल्यानंतरही आई-वडिलांच्याच जीवावर त्यांच्याच घरात राहणे आणि त्यांचीच अवहेलना करणे खरोखरच धक्कादायक बाब आहे. अशावेळी मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची अपरिहार्य परिस्थिती निर्माण करणारी पाश्‍चात्य संस्कृती अधिक सरस आहे असे वाटू लागते.

आपल्याकडे पालकांच्या अवहेलनेला अनेक घटक जबाबदार आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे अतिप्रेम किंवा नको तेवढे लाड. आपल्याकडे पालक प्रेमापोटी आपल्या पाल्याला स्वातंत्र्य देतात. "आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळायला हवे', अशा सूरात मुलांचे लाड पुरविले जातात. "आम्ही आमच्या मुलांकडे पाहून स्वत:चे बालपण अनुभवत आहोत', असे गोंडस विश्‍लेषणही सर्रासपणे केलेले दिसते. परिणामी यातून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले जाते. अशा वातावरणात मुलगा मोठा होत राहतो. त्याचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी शोधेपर्यंत त्याला कसलाही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. मुलगा इतर श्रीमंत मुलांशी स्वत:ची तुलना करू लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा पालकांकडे हट्ट करू लागतो. पालकही कर्जबाजारी होऊन मुलाच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आटोकाठ प्रयत्न करतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीचा शोध सुरू होतो. थोड्या प्रयत्नानंतर मुलाला चांगली नोकरीही मिळते. मग त्याच्या पगारावरही आपला हक्क नसल्याचा आव पालक आणतात. वास्तविक त्यावेळी पालक निवृत्त झालेले असतात. महागाई वाढलेली असते. घरातील खर्च वाढलेला असतो. उत्पन्न कमी झालेले असते. वृद्धापकाळ असल्याने औषधोपचारांचा खर्चही वाढलेला असतो. तरीही ते आपल्या स्वत:च्या मुलाला जास्त पैसे मागत नाहीत. कारण त्याला लाडात वाढवलेले, पैसे मागितल्यावर त्याला वाईट वाटेल म्हणून! जर मुलाला त्याच्या मनासारखी चांगली नोकरी मिळाली नाही तर मात्र मुलगा आई-बाबांच्या जीवावरच मजेत जगू लागतो. त्याला त्याचे फारसे काही वाटत नाही. काही बोलायलाही भाग नाही. कारण लाड!

अशा साऱ्या परिस्थितीत पुन्हा मुलाच्या विवाहाचा प्रश्‍न उपस्थित होतो. मग मुलीचा शोध सुरू होतो. "हल्लीच्या मुलीच्या अपेक्षा बाई फार!', असे म्हणत वृद्ध पालक वधूसंशोधन सुरूच ठेवतात. बऱ्याच घरात मुलाने निवडलेल्या मुलीला अगदी पसंत नसतानाही स्वीकारले जाते. कारण मुलाला लाडात वाढवलेले. आयुष्यभराची उरली सुरली पुंजी पालक आपल्या मुलाच्या विवाहात खर्च करतात. विवाहानंतर एकदम परिस्थिती बदलते. लहानपणी आईच्या मांडीवर निजणाऱ्या मुलाला आईशी दोन शब्द बोलायलाही वेळ मिळत नाही. बापाशी खटके उडू लागतात. "साऱ्या आशा पुत्रार्पण' परिस्थिती असल्याने मुलाशी वाकड्यात जाता येत नाही. यातून आलेल्या हतबलतेमुळे मुलासोबत राहावे लागते. कारण मुलाला लाडात वाढवलेले. वास्तविक स्वत:चे घर असेल तर ते अद्यापही बापाच्याच नावाने असते. मात्र स्वत:च्याच घरात बापाला आश्रितासारखे राहावे लागते. आई-बाप एकांतात पोटभर रडून घेतात. मुलाला आयते घर राहायला मिळालेले असते. केवळ दोन वेळच्या जेवणाचा खर्च त्याला करावा लागतो. त्यात मुलपाठोपाठ त्याच्या बायकोलाही घरातील वृद्धलोक ही कटकट वाटू लागते आणि घरातील वातावरण दूषित होऊ लागते. त्यामुळे मग "स्वत:च्या घरात मुलाला का ठेवायचे?' असा प्रश्‍न उपस्थित राहणे आणि त्यासाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणे यात नावीन्य ते काय?

अर्थात येथे वर्णन केलेली ही अशीच परिस्थिती सगळीकडे असते असे नाही. यापेक्षा वेगळी प्रसन्न, हसतखेळत आणि मैत्रीपूर्ण वातावरण असलेली परिस्थिती अनेक घरांमध्ये दिसत असेल. मात्र, चांगल्या वातावरणाचे हे प्रमाण कमी होत चालले असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वेळीच या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे नितांत आवश्‍यक आहे. मुलाचे लाड हवेत; पण पालक श्रीमंत असोत अथवा गरीब पाल्याला कुटुंबाच्या उत्पन्नाबद्दल, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाबद्दल अगदी लिहिता-वाचता येऊ लागल्यापासून हळूहळू, प्रेमाने जाणीव करून देणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यातून त्याला सज्ञान होईपर्यंत स्वत:च्या परिस्थितीची जाणीव होऊ शकेल.

या संदर्भात पालकांनी आणि भविष्यात पालक होणाऱ्यांनी खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

  1. मुलांचे नको तेवढे लाड करू नका. त्यांना परिस्थितीची, कुटुंबाच्या उत्पन्नाची जाणीव करून द्या.
  2. केवळ भौतिक गोष्टीतूनच आनंद मिळतो हा मुलाच्या मनातील गैरसमज काढून टाका.
  3. आपल्या मुलाला इतरांशी तुलना करण्याची वृत्ती दूर ठेवायला सांगा.
  4. मुलाला प्रेम करा. त्याचप्रमाणे चुकीचे वागल्यास कठोर शब्दांत सांगा. पालक म्हणून मुलांना तुमची आदरयुक्त भीती वाटेल, असे वागा.
  5. आयुष्याच्या उतारवयात केवळ मुलावरच विसंबून न राहता उदरनिर्वाह आणि उत्तम आरोग्यासाठी पुरेशी तरतूद करून ठेवा.
  6. मुलगा जर काही कमावत नसेल तर त्याला नोकरी, व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करा. आवश्‍यक तेथे आर्थिक मदतही करा.
  7. विवाहामध्ये अवास्तव खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. अनावश्‍यक खर्च टाळून उरलेली रक्‍कम साठवून ठेवा.

अशा काही सावध उपायांची अंमलबजावणी केली तर भारतासारख्या देशात स्वत:च्या घरातून स्वत:च्याच मुलाला हाकलून देण्याच्या मागणीसाठी न्यायालयात लढा द्यावा लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com