कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन कमळ; दहा आमदार गैरहजर 

 कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन कमळ; दहा आमदार गैरहजर 

बंगळूर : विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आघाडीचे 10 आमदार गैरहजर राहिले. त्यात कॉंग्रेसच्या 9 व धजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. हे सर्व जण भाजपच्या ऑपरेशन कमळच्या जाळ्यात अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला आज सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आघाडीचे 10 आमदार अनुपस्थित राहिले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सर्व आमदारांनी सक्तीने हजर राहावे, सरकारच्या बाजूने मतदान करावे, असा व्हीप कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या व विधानसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद गणेश हुक्केरी यांनी मंगळवारीच जारी केला होता. तरीही कॉंग्रेसचे असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी (गोकाक), महेश कुमठळ्ळी (अथणी), बी. नागेंद्र (बळ्ळारी ग्रामीण), डॉ. उमेश जाधव गैरहजर राहिले. त्यांच्याबरोबरच जे. एन. गणेश (कंप्ली), बी. सी. पाटील (हिरेकेरूर), डॉ. सुधाकर (चिक्कबळ्ळ्पूर), रामलिंगा रेड्डी (बीटीएम लेऔट) व सौम्या रेड्डी (जयनगर) हे कॉंग्रेसचे आमदार गैरहजर राहिले. धजदचे नारायणगौडा (केआर पेठ), तसेच अपक्ष आमदार आर. शंकर (राणेबेन्नूर) व नागेश (मूळबागिलू) यांचीही अधिवेशनात गैरहजरी होती.

धजदने व्हीप जारी केला नव्हता, तर अपक्षांना हा नियम लागू होत नाही. त्यामुळे या तिघांना कायद्याची कोणतीच अडचण येणार नाही. परंतु, कॉंग्रेसचे 9 आमदार दुपारी एक वाजेपर्यंत विधानसभेकडे फिरकलेच नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी हजेरी पुस्तकांत सही केली नाही. या आमदारांच्या गैरहजेरीमुळे ते ऑपरेशनच्या जाळ्यात अडकल्याची शक्तीकेंद्र परिसरात दिवसभर चर्चा होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव किंवा अर्थसंकल्प सादर करावयाच्या वेळी असंतुष्ट आमदारांना गैरहजर ठेवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याची चर्चा आहे. 

भाजपचे चौघे अनुपस्थित 

विरोधी पक्षाचेही चार आमदार अनुपस्थित होते. डॉ. अश्वत्थ नारायण (मल्लेश्वरम), भालचंद्र जारकीहोळी (आरभावी), प्रा. लिंगण्णा (मायकोंड) व अरविंद लिंबावळी (महादेवपूर) यांचा त्यामध्ये समावेश आहे. कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांची मुंबईत व्यवस्था करण्याची जबाबदारी अश्वत्थ नारायण व भालचंद्र जारकीहोळी यांच्यावर असल्याचे समजते. लिंगण्णा व अरविंद लिंबावळी हे आजारी असल्याने येऊ शकले नाहीत. तसे त्यांनी प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना कळविले असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com