कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी!

BJP
BJP

नवी दिल्ली : कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि कॉंग्रेसच्या 11 आमदारांनी राजीनामे दिल्याने भाजपची सत्ताप्राप्तीची आशा पल्लवित झाली असून, बी. एस. येडियुरप्पा यांचे नाव आगामी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत प्रचार चालविला आहे. भाजपचा आक्रमकपणा पाहता राज्यात घोडेबाजार अटळपणे सुरू झाल्याचे मानले जाते. कर्नाटकात बहुमतासाठी 118 चा आकडा जमविणे भाजपला कठीण दिसत नाही. 

'आमच्याकडे 14 राज्ये आहेत. एखाद्या राज्यासाठी आम्ही उतावीळ होत नाही,' असे वरकरणी म्हणणाऱ्या भाजप नेतृत्वाने 'काँग्रेसमुक्त भारत' घोषणेनुसार कर्नाटकातील सत्ता हस्तगत करण्याच्या ईर्षेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. तरीही त्यांना येडियुरप्पांशिवाय पर्यायच नाही. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या अकाली निधनानंतर कर्नाटकात येडियुरप्पावगळता भाजपची स्थिती जवळपास नेताविहीन झाली आहे. 

जास्तीत जास्त या महिनाअखेर काहीही करून येडियुरप्पा यांचे सरकार बनविण्यासाठी दिल्लीतूनही 'रसद' पुरविण्याची तयारी भाजपने केली आहे. कर्नाटकातील आमदारांचे राजीनामासत्र सुरू होण्याच्या बातम्या दुपारी दिल्लीत पोचल्यावर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी तातडीने 'येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन होईल,' असे भाकीत करणारे ट्विट केले. येडियुरप्पा यांच्या म्हणण्यानुसार भाजप परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. राज्यातील जनतेला निवडणूक नको आहे, त्यामुळे स्थिर सरकारची हमी देणाऱ्या भाजपचेच सरकार येणे राज्याच्या दृष्टीने हिताचे आहे. राज्यपालांनी बोलावले, तर आम्ही सरकार स्थापन करू, असे भाजप नेते आत्मविश्‍वासाने सांगत आहेत. 

काँग्रेसबाबतही संशय 
कर्नाटकातील ऑपरेशन कमळचे यश म्हणजे सत्तेतील 11 आमदारांचे राजीनामे मानले जाते. यातील काहींनी सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्याची मागणी केल्याने या राजकीय अस्थिरता व सत्तासंघर्षातील कॉंग्रेसच्या अदृश्‍य सहभागाचाही संशय यावा, अशी परिस्थिती आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते सध्याचे कुमारस्वामी सरकार विधानसभेच्या परीक्षेत टिकणे आता अशक्‍य असून, त्याचा लाभ घेण्याइतकी "सशक्त' स्थिती फक्त भाजपचीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com