ऑपरेशन लोटस दिल्लीत अपयशी ठरलं? पण भाजप ‘आप’च्या मागे का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Operation Lotus Delhi politics

ऑपरेशन लोटस दिल्लीत अपयशी ठरलं? पण भाजप ‘आप’च्या मागे का ?

दिल्ली : ऑपरेशन लोटस हे सध्या संपूर्ण देशभरातील राजकारणात चांगलंच चर्चेत आहे. २०१९ साली आणि त्यानंतरही महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. त्याअंतर्गत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. आताही राज्यातील सत्तांतरावेळी शिंदे गटाला बाजूला करण्यात भाजपचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नक्कीच झाली. त्यात आता भाजपचा निशाणा हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपनं ऑपरेशन लोटस सुरु केल्याची चर्चा आहे. आणि या चर्चेला आज पूर्णविराम देऊन भाजपचं दिल्लीतील ऑपरेशन लोटस केजरीवालांनी अपयशी ठरवल्याचा दावा आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला.

राजधानी दिल्लीत आज (गुरुवारी, २५ ऑगस्ट, २०२२) सकाळी ११ वाजता आपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यात ६२ पैकी ५४ आमदारांनी बैठकीला हजेरी लावली होती. पण काल या बैठकीआधी आपचा ४० आमदारांशी संपर्क होऊ शकला नव्हता, अशी माहिती होती. पण आज ५४ आमदारांनी हजेरी लावून आपचं एकहाती सरकार कायम असल्याचं दाखवून दिलं, असा दावाही आप नेत्यांनी केला. दरम्यान, राजधानी दिल्लीच्या विधानसभेत ७० जागा आहेत. त्यातील ६२ जागांवर आप तर ८ ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आलेत. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या दिल्ली विधानसभेतील आपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येतोय, असा आरोप आपकडून करण्यात आलाय.

काल आपचे ज्येष्ठ नेते दिलीप पांडे यांनीही भाजपकडून आपच्या ४० आमदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी त्यांनी आमदारांनी आप पक्ष सोडल्यास २० कोटी आणि इतरांना सोबत घेऊन आल्यास २५ कोटींची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप भाजपवर केला. त्यामुळे आता भाजप आपच्या मागे हात धुऊन का लागलंय?

तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावत आणि शिंदे गटाला फोडून भाजपनं फडणवीसांच्या नेतृत्वात पण एकनाथ शिंदेंच्या हाती मुख्यमंत्रिपदाची धुरा देत आपली सत्ता आणली. तर तिकडे बिहारमध्ये नीतीश कुमारांनी मोदी-शाहांना धक्का देत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपला दे धक्का दिला. त्यात अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वात ११७ जागा असलेल्या पंजाब विधानसभेत आपचे तब्बल ९२ आमदार विजयी झाले आणि तिथेही दिल्लीप्रमाणेच आपची एकहाती सत्ता आली आहे. तर तिकडे गोव्यातही आपचे दोनच आमदार जिंकले असले तरी इतर उमेदवारांनीही चांगल्या प्रमाणात मतं मिळवली. त्यामुळे आपचा प्रभाव हा आता हळूहळू देशभर पसरताना दिसतोय. त्यात अरविंद केजरीवालांची संभाषणाची भाषा हिंदी आहे. त्यात ते सर्वसामान्य लोकांच्या जीवनातल्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचा कायम प्रयत्न करत असतात. त्यामुळे आप पक्षाला आणि परिणामी नेतृत्वाला देशभरात पसरण्यापासून दिल्लीतच रोखण्याचा भाजपचा डाव आहे.

आताची परिस्थिती सांगायची झाल्यास, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांनाही वारंवार सीबीआयच्या धाडी टाकत दबावाखाली आणलं जात असल्याचा आरोप आपकडून करण्यात आलाय. दिल्लीतील शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचं अगदी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये कौतुक करण्यात आलं होतं. त्याविषयी मनिष सिसोदीया यांनी फोटो शेअर केला होता. त्यानंतर काही दिवसातच सिसोदियांच्या घरी सीबीआयचं धाडसत्र सुरु झालं. त्यात आपल्यालाही पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला पण त्यात भाजप अपयशी ठरल्यानंतर इतर आमदारांना भाजपकडून ऑफर दिली जात असल्याचं ट्विट सिसोदियांनी केलं. यावेळी त्यांनी एक वेळ जीव देऊ, पण केजरीवालांशी गद्दारी करणार नाही, असं ठणकावून सांगितलंय.

सध्या देशात अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नीतीश कुमार यांचं नेतृत्व सर्वमान्य होताना दिसतंय. भाजप जिथे विरोधकांना संपवून देशात एकहाती सत्ता आणण्याच्या, राज्य आणि केंद्रावर आपलंच नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तिथे ममता बॅनर्जी भाजप विरोधकांना एकत्र करुन विरोधकांची मोट बांधण्याकडे वळल्या आहेत. त्यामुळे या विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजप देशभरात ऑपरेशन लोटस राबवत आहे. तरी, दिल्लीतील ऑपरेशन लोटसचा प्रयत्न तूर्तास अयशस्वी ठरल्याचं दिसतंय, कारण आजच्या बैठकीत ६२ पैकी ५४ आमदारांनी बैठकीला हजेरी लावली. त्यात जे बैठकीला उपस्थित नव्हते त्यांच्याशी केजरीवालांनी फोनवरुन संपर्क साधल्याचा दावा आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला. त्यामुळे दिल्लीत भाजपचं ऑपरेशन लोटस आणि आपचा संघर्ष पुढे आणखी काय वळण घेतो हे तर आपल्याला येत्या काळातच कळेल.

- कोमल जाधव

Web Title: Operation Lotus Delhi Politics Aap Ncp Shiv Sena Congress Leaders Join Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..