काँग्रेस - धजदच्या सर्व आमदारांना तातडीने बंगळूरला येण्याचे आदेश

 काँग्रेस - धजदच्या सर्व आमदारांना तातडीने बंगळूरला येण्याचे आदेश

बंगळूर - दोघा अपक्ष आमदारांनी पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. युती सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेस व धजद मित्र पक्ष सरकार वाचविण्यासाठी डावपेच आखत आहे. दरम्यान, काँग्रेस व धजदच्या सर्व आमदारांना तातडीने बंगळूरला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईला गेलेले पाच व अन्य काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने घटनात्मक पेच निर्माण करण्याची योजना युती सरकारची आहे. आजच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आज साखळी बैठका झाल्या. मुख्यमंत्री कुमारस्वामी व काँग्रेसचे प्रभारी वेणुगोपाल यांनी प्रदीर्घकाळ चर्चा करून काही योजना हाती घेतल्याचे समजते.

आज (ता. १६) असंतुष्ट आमदार राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. यासाठी विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांना बुधवारी (ता.१६) पहाटेच विदेश दौऱ्यावर पाठवून देण्याची चर्चा आहे. सभाध्यक्ष रमेशकुमार राजीनामा मंजूर करेपर्यंत असंतुष्टांचे आमदारपद रद्द होणार नाही. यासाठी त्यांनी किमान २६ जानेवारीपर्यंत विदेश दौऱ्यावर जावे व तोवर वाटाघाटीतून मार्ग काढता येईल, अशी योजना आखण्यात आली असल्याचे समजते.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी असंतुष्ट आमदारांनी राजीनामा देण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठराव दाखल करावा, अशी योजना मांडल्याचे समजते. सर्व आमदारांना व्हीप जारी करून विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश द्यावा. व्हीपचे उल्लंघन करून असंतुष्ट आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाविरुध्द मतदान केल्यास, त्यांना निलंबित करता येईल व सरकार वाचविता येईल. सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकल्यास पुढील सहा महिने सरकारला कोणताच धोका पोहोचणार नाही, अशीही योजना विचाराधीन असल्याचे समजते.

सतीश जारकीहोळी बंगळूरकडे
मंत्री व रमेश जारकीहोळी यांचे बंधू सतीश जारकीहोळी यांनाही बंगळूरला तातडीने बोलावण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांची भूमिका त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यांना पक्षाशी एकनिष्ठ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते. सतीश जारकीहोळी तातडीने बंगळूरला रवाना झाले आहेत. पक्षातील आमदारांत मतभेद असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले; परंतु त्याचा सरकारच्या अस्तित्वावर परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com