तरुण विजय यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

वादग्रस्त टिप्पणी करणारे जर्मनीतून आले असावेत आणि ते हिटलरचे वंशज असावेत.
- मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसचे नेते

नवी दिल्ली -  भाजपचे माजी खासदार तरुण विजय यांनी दाक्षिणात्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जावा, अशी मागणी करत कॉंग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले; मात्र गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भारतात धर्म, जात, वंश यावरून कोणाशीही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच तरुण विजय यांनी माफी मागितल्यामुळे हा मुद्दा संपला आहे, असे म्हणत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेचे कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित करून सरकारकडे कारवाईची मागणी केली. त्यामुळे प्रश्‍नोत्तराचा तास दहा मिनिटांसाठी तहकूब करावा लागला होता. त्यानंतर लोकसभाध्यक्षांच्या परवानगीने शून्यकाळात त्यांनी हा विषय मांडताना सत्ताधारी भाजपला धारेवर धरले. तरुण विजय हे संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या "पांचजन्य'चे माजी संपादक, राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजपचे पदाधिकारी राहिले आहेत. त्यांनी दक्षिण भारतीयांविरुद्ध केलेली संतापजनक टिप्पणी केवळ तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनाच नव्हे, तर ओडिशा, झारखंडच्या नागरिकांनाही लागू होणारी आहे. येथील रहिवासी हे भारताचे नागरिक नाहीत काय, असा प्रश्‍न खर्गे यांनी केला. तसेच "वादग्रस्त टिप्पणी करणारे जर्मनीतून आले असावेत आणि ते हिटलरचे वंशज असावेत,' अशा शब्दांत निषेध करताना तरुण विजय यांच्यावर कारवाईची मागणी केली.

सरकारची भूमिका स्पष्ट करताना राजनाथसिंह यांनी हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, येथे जात, वंश, धर्म, वर्ण यावरून कोणाशीही भेदभाव केला जात नाही. तरुण विजय यांचे नाव घेता राजनाथसिंह म्हणाले, की त्यांच्या वक्तव्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही; मात्र त्यांनी क्षमायाचना केली असून, स्वतःला तमीळ मातेचा दत्तकपुत्र असल्याचेही म्हटले आहे. त्यांच्या माफीनाम्यामुळे हा विषय संपला आहे; परंतु या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी तरुण विजय यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. यामुळे लोकसभेचे कामकाज विस्कळित झाले.

Web Title: Oppn creates ruckus in Parliament over Tarun Vijay racism row