नोटबंदीवरून लोकसभा, राज्यसभेत गदारोळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून गाऱ्हाणे मांडले होते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद आज (गुरुवार) लोकसभा आणि राज्यसभेत उमटले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर, राज्यसभेतही गोंधळ पहायला मिळाला.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच देशभर चर्चेत असलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे पडसाद संसदेत पहायला मिळाले. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून गाऱ्हाणे मांडले होते. आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावरून गदारोळ केला.

राज्यसभेत तृणमुल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसच्या खासदारांनी मोकळ्या जागेत येत सरकारविरोधात घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत येऊन नोटबंदीच्या निर्णयावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. सुरवातीला राज्यसभेचे कामकाज साडेअकरापर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा गोंधळ झाल्याने दोनपर्यंत कामकाज थांबविण्यात आले.

लोकसभेतही काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. नियम 56 नुसार नोटबंदीच्या निर्णयावर चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांकडून करण्यात आली. दोनवेळा कामकाज तहकूब केल्यानंतर अखेर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. 

Web Title: opposition corners modi government on demonetisation