नोटाबंदीने भाजपलाच लक्ष्मीदर्शन

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : संसदेत विरोधकांच्या भक्कम एकजुटीमुळे पिछाडीवर गेलेल्या सत्तारूढ भाजपने नोटाबंदीनंतर कोटीच्या कोटी किमतीच्या नवनव्या मालमत्ता देशभरात खरेदी करण्याचा सपाटा लावल्याचा आक्षेप आहे.

भाजपच्या देशभरातील सर्व जिल्हा कार्यालयांचे नूतनीकरण करून ती चकाचक करण्यालाही नेमका नोटाबंदीनंतरचाच "मुहूर्त' मिळाल्याने ही बाब रांगांत ताटकळणाऱ्या सामान्यांच्या भुवया उंचावणारी ठरते आहे. मात्र भाजपने सारे आरोप साफ फेटाळले आहेत.

नोटाबंदीनंतर देशभरात बाहेर येऊ लागलेल्या अमाप पैशातून भाजपलाच लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, या पक्षाने देशभरात अमाप मालमत्ता खरेदीचा सपाटा लावल्याचे आरोप होत आहेत. जिल्हा भाजप मुख्यालये चकाचक करण्याची प्रक्रिया येत्या डिसेंबरपासून धडाक्‍याने सुरू होणार आहे. भाजपच्या आलिशान राष्ट्रीय मुख्यालयासह सत्तारूढ खासदार व मंत्र्यांना नोटाबंदीची झळ पोचल्याचे एकही उदाहरण अद्याप समोर आले नसल्याचे राज्यसभेतील चर्चेवेळी वक्‍त्यांनी नमूद केले होते.

भाजपच्या म्हणण्यानुसार पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाची सारी जिल्हा मुख्यालये अत्याधुनिक स्वरूपात बांधण्याची सूचना 2015 मध्ये केली. मात्र, या साऱ्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला 8 नोव्हेंबर 2016 नंतरचा मुहूर्त सापडला. या योगायोगाचीही चर्चा राजधानीत सुरू आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पक्षावरील सारे आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, संसद यावरून 10 दिवस ठप्प पडली असून, पंतप्रधानांच्या "तयारी'च्या वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आहे. मोदींनी माफी मागावी, ही मागणी तीव्र असल्याने आगामी आठवडाभर कामकाज सुरळीत चालण्याबाबत शंका उपस्थित होत आहे. भाजपचे खासदार सेंट्रल हॉलमध्ये येण्याचेही टाळू लागले आहेत. सामान्य लोकांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांचा घामाचा पैसा सुरळीतपणे मिळाला नाही, तर महत्त्वाकांक्षी जीएसटी विधेयकही अंधारात जाणार आहे. नोटाबंदीविरोधात संसदेत 15 विरोधी पक्षांची भक्कम आघाडी आहे. या मुद्यावरून संसदेत सरकारच्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांना अण्णा द्रमुक, बीजू जनता दल व शिवसेनेचीही साथ मिळाल्याने भाजपचे चाणक्‍यही गोंधळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com