ई. अहमद यांच्या मृत्यूची चौकशी करा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : लोकसभेचे दिवंगत सदस्य ई. अहमद यांच्या निधनावरून उद्भवलेला वाद शमण्यास तयार नाही. कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी संसदीय समिती नेमण्याची मागणी केली असून आज पुन्हा एकदा लोकसभेत यावरून जोरदार गोंधळ झाला. यामुळे लोकसभाध्यक्षांना प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब करावा लागला.

लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी ई. अहमद निधन प्रकरणावरून गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेही यात सहभागी झाले होते. ई. अहमद यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादाची चौकशी होण्याची आवश्‍यकता आहे. निधन नेमके केव्हा झाले, त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून का अडविण्यात आले, या त्रासाबद्दल कोण जबाबदार आहे या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे सरकारने द्यावीत. त्यासाठी संसदीय समिती नेमली जावी, अशी मागणी या नेत्यांनी केली. त्यानंतर सभागृह सुरू होताच, आक्रमक झालेल्या विरोधकांनी आपल्या मागणीसाठी गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे कामकाज चालविणे अशक्‍य झाल्याने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दुपारी बारापर्यंत सभागृह तहकूब केले.

या मुद्द्यावर पीआरएसचे खासदार एम. के. प्रेमचंद्रन, कॉंग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. दुसरीकडे, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून निधनाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. या गोंधळामुळे गेल्या आठवड्यात लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा सुरू होऊ शकली नव्हती. तर राज्यसभेमध्येही कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला घेरले होते.

Web Title: opposition demands inquiry in e ahmed's death