
Hindenberg on Adani : विरोधक आक्रमक; खासदारांच्या सह्यांच्या पत्रासह ईड़ी कार्यालयावर धडक मोर्चा
अदानी समूहाविरोधात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. संसदेतून विरोधक आता थेट रस्त्यांवर उतरले आहेत. विरोधकांनी ईडी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. ईडीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
विजय चौकातून विरोधी पक्षाचे नेते पुढे जात असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखलं. याआधी बुधवारी संसद भवनातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झालेल्या बैठकीला अनेक विरोधी खासदार उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे सर्व खासदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र ईडीला सोपवतील.
मोर्चादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अदानी घोटाळ्याप्रकरणी आम्ही ईडीच्या संचालकाची भेट घेणार आहोत. मात्र सरकार आम्हाला विजय चौकाजवळ कुठेही जाऊ देत नाही, त्यांनी आम्हाला रोखले आहे. लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे, एलआयसी, एसबीआय आणि इतर बँका डबघाईला आल्या आहेत.

अदानींच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विजय चौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यापासून विरोधक अदानीचा मुद्दा उचलत आहेत आणि हिंडेनबर्ग-अदानी अहवालाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
एका महिन्याच्या विश्रांतीनंतर सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. विरोधकांच्या सततच्या गदारोळ आणि विरोधामुळे संसदेच्या सत्रात वारंवार व्यत्यय येत आहे.
या मोर्चात कोणकोणते पक्ष सहभागी?
द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), समाजवादी पक्ष, जनता दल (संयुक्त), आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), केरळ काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, इंडियन युनियन मुस्लिम लीग, शिवसेना (उद्धव ठाकरे) ), मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, विदुथलाई चिरुथाईगल काची आणि काँग्रेस सहभागी झाले होते. मात्र, राष्ट्रवादी आणि तृणमूल मोर्चात सहभागी झाले नाहीत.