अपयश लपविण्यासाठी राजीनामानाट्य: जदयू

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - गुजरात सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे राजीनामानाट्य करण्यात येत असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने केला आहे. 

नवी दिल्ली - गुजरात सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे राजीनामानाट्य करण्यात येत असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने केला आहे. 

वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते के सी त्यागी म्हणाले, ‘गुजरात आधीच पाटीदारांच्या आंदोलनामुळे ढवळून निघाला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दलितांनी आता चळवळ सुरू केली असून ती हाताळण्यास सरकार असमर्थ आहे. तेथे अराजकता माजली आहे. हे सर्व अपयश लपविण्यासाठी हे राजीनामा नाट्य खेळण्यात येत आहे.‘ कॉंग्रेसनेही भाजपवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या, ‘राजीनाम्याची परिस्थिती अचानक उद्‌भवली आहे. त्या वय झाल्याचे म्हणत आहेत. पण या राजीनाम्यामागे वयाचा मुद्दा असेल असे मला वाटत नाही. मला वाटते राज्यात अलिकडे दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे त्या राजीनामा देत आहेत. आता पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा स्वीकारतात की नाही हे पाहुयात!‘ 

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची लोकप्रियता वाढत असल्यानेच आनंदीबेन पटेल या राजीनामा देत आहेत‘ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Opposition parties lashes out at Anandiben Patel's resignation