हल्ल्याची शक्‍यता गृहीत धरून दक्षतेचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन काल लष्कराने केलेले लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) आणि त्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारतर्फे आज महत्त्वाच्या बैठकीत अंतर्गत सुरक्षा, तसेच सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. सर्जिकल हल्ल्यानंतरची उद्‌भवलेली परिस्थिती, पाकिस्तानकडून येऊ शकणारे संभाव्य उत्तर किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास तो नेमका कोठे होऊ शकतो, याचा अंदाज बांधणे आणि आपली सुसज्जता तपासणे, यावर विचारविनिमय करण्यात आला. संभाव्य दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता गृहीत धरून केंद्राने राज्यांना दक्षतेचा आदेशही दिला.

नवी दिल्ली - नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन काल लष्कराने केलेले लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) आणि त्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारतर्फे आज महत्त्वाच्या बैठकीत अंतर्गत सुरक्षा, तसेच सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. सर्जिकल हल्ल्यानंतरची उद्‌भवलेली परिस्थिती, पाकिस्तानकडून येऊ शकणारे संभाव्य उत्तर किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास तो नेमका कोठे होऊ शकतो, याचा अंदाज बांधणे आणि आपली सुसज्जता तपासणे, यावर विचारविनिमय करण्यात आला. संभाव्य दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता गृहीत धरून केंद्राने राज्यांना दक्षतेचा आदेशही दिला.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, गृहसचिव राजीव महर्षी आणि गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीमध्ये अजित दोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांची व सुरक्षा यंत्रणांच्या सज्जतेची माहिती दिली. तत्पूर्वी राजनाथसिंह यांनी नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी), राष्ट्रीय आपत्कालीन कृती दल (एनडीआरएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) या संस्थांच्या प्रमुखांचीही बैठक घेऊन आढावा घेतला. ‘सीआयएसएफ’चे महासंचालक ओ. पी. सिंह, ‘एनडीआरएफ’चे महासंचालक आर. के. पचनंदा आणि ‘एनएसजी’चे प्रमुख सुधीर प्रताप सिंह या वेळी उपस्थित होते.

भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) अधिक सजग राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे या बैठकीनंतर सूत्रांनी सांगितले. ‘बीएसएफ’च्या तुकड्या जम्मू, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील ठिकाणांवर ‘बीएसएफ’च्या तुकड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. विमानतळ, औद्योगिक संस्था, महत्त्वाचे प्रकल्प, मेट्रो रेल्वे, धार्मिक स्थळे, ताजमहालसारखी (आग्रा) पर्यटन स्थळे यांसारख्या ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलालाही (सीआयएसएफ) डोळ्यांत तेल घालून सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. नौदलाच्या पश्‍चिम विभागालाही दक्षता घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या किनारपट्टीवरील राज्यांनाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा भागातील पंजाब, जम्मू-काश्‍मीर या राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांना आधीच अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमेलगतची गावेही दक्षता म्हणून रिकामी करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि अर्थातच महाराष्ट्र या राज्यांनाही दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग, आर्थिक केंद्रे असलेल्या हैदराबाद, बंगळूर, दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता येथील केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या युद्धाचे अथवा ‘सर्जिकल ॲटॅक’बाबत कोणतही तणावाचे वातावरण नाहीये. दुबईत पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांचा सामना रंगलाय, लोक तो पाहण्यात मग्न आहेत. मीदेखील इस्लमाबादमध्ये टीव्हीवर ही मॅच बघतोय. लाहोरमध्ये इम्रान खान यांची सभा होणार आहे, त्याची जय्यत तयारी सुरू आहे. तर कराचीत पीपल्स पार्टीची सभा होणार आहे त्याची तयारी सुरू आहे. सेन्सेक्‍स २३० अंकांनी वधारला आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण असले, तरीही मला असे वाटते, की युद्ध हा पर्याय नाही. जे दहशतवादी कारवाया करत आहेत ते पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांचे शत्रू आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येऊन त्यांचा बीमोड करावा.

- हमीद मिर, पाकिस्तानातील पत्रकार

सर्जिकल स्ट्राइकनंतर...

अखनूर सीमेवर पाकिस्तानचा शस्त्रसंधीभंग

नियंत्रण रेषेवरील गावांत सावध हालचालींची गावकऱ्यांना सूचना

एक जवान किरकोळ जखमी; पण कारवाईचा संबंध नाही ः लष्कराचे स्पष्टीकरण

पाकिस्तानी माध्यमांतील दृश्‍ये ‘मॉर्फ्ड’ असल्याचा लष्कराचा खुलासा

सुरक्षेच्या आघाडीवर...

राजनाथसिंह यांनी घेतली बैठक; अजित दोवाल यांची उपस्थिती

‘एनएसजी’, ‘एनडीआरएफ’, ‘सीआयएसएफ’प्रमुखांबरोबर चर्चा

संवेदनशील ठिकाणांवर ‘बीएसएफ’च्या तुकड्यांची संख्या वाढविली

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळला अतिदक्षतेचा आदेश

दक्षता म्हणून सीमेलगतची गावे रिकामी केली

सरकारची संयमी भूमिका

‘सर्जिकल स्ट्राइक’बद्दल सरकारतर्फे आजही तपशील देण्यात आले नाहीत. या मोहिमेत हेलिकॉप्टरचा वापर झाला होता की नाही, यावर दिवसभरात उलटसुलट चर्चा सुरू होती. यावर संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, की सीमा भागात रसद पुरवठा करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या फेऱ्या सुरू असल्याचे भासवून कमांडो तुकड्या पाकिस्तानी हद्दीत शिरल्या आणि त्यांनी ही मोहीम फत्ते केली. मात्र संरक्षण मंत्रालयाच्या आघाडीवर आज दिवसभर फारशा घडामोडी नव्हत्या. किंबहुना कालच्या घटनेनंतर सरकारने संयमी भूमिका घेतली. राजकीय पातळीवरही सत्ताधारी भाजपने याबाबत जल्लोष करण्याचे आणि अतिउत्साह दाखविण्याचे टाळले.

Web Title: Orders delivered efficiently assume the possibility of attack