माजी सैनिकाच्या अंत्यसंस्काराला नेत्यांची गर्दी

पीटीआय
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे जोरदार राजकीय पडसाद दिल्लीत बुधवारी उमटले. या माजी सैनिकाच्या कुटुंबाला एका रुग्णालयात भेटण्यापासून रोखल्याने; तसेच पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल; तसेच अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला.

राहुल गांधी उपस्थित; केजरीवालांकडून 1 कोटी रुपयांची मदत
भिवानी - "वन रॅंक वन पेन्शन'च्या (ओआरओपी) मागणीसाठी माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी केलेल्या आत्महत्येवरून सलग दुसऱ्या दिवशीही राजकारण सुरू होते. आज हरियानातील भिवानी येथे ग्रेवाल यांच्या अंत्ययात्रेला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली.

दरम्यान, केजरीवाल यांनी ग्रेवाल यांच्या कुटुंबाला दिल्ली सरकारकडून एक कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली. त्याशिवाय हरियानाचे परिवहनमंत्री किशनलाल पनवार यांनी ग्रेवाल कुटुंबीयांची भेट घेऊन 10 लाख रुपये मदत आणि कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.
ग्रेवाल यांचा मोठा मुलगा दिलावर यांनी येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामला गावी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांच्या उपस्थित आज दुपारी अंत्यसंस्कार केले. 70 वर्षीय रामकिशन ग्रेवाल यांनी मंगळवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे विष पिऊन आत्महत्या केली होती. ग्रेवाल यांनी त्यांच्या गावाचे सरपंचपदही भूषविले आहे.

ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे तीव्र राजकीय पडसाद काल (बुधवारी) नवी दिल्लीत उमटले होते. राहुल गांधी, केजरीवाल आणि अन्य काही नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला होता. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्यांची सुटका केली होती. आजही दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

ग्रेवाल यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी गावात पोचल्यानंतर गर्दीतून "रामकिशन अमर रहे'च्या घोषणा दिल्या जात होत्या. हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते किरण चौधरी, सेलजा आणि कुलदीप बिश्‍नोई हे अन्य कॉंग्रेस नेतेही या वेळी उपस्थित होते. कॉंग्रेस नेते कमलनाथ आणि रणदीप सिंह सुरजेवाला तसेच तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रायन हेदेखील गावात पोचले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा ग्रेवाल यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. भाजपचे खासदार रतनलाल कटारिया आणि धरांबीरसिंह तसेच हरियानाचे मंत्री किशनलाल पनवार यांनीही ग्रेवाल कुटुंबाची भेट घेतली.

ज्या अहंकाराने कॉंग्रेसला बुडवले तोच अहंकार भाजपलाही बुडवेल. मी पोलिसांच्या अटकेला घाबरत नाही; पण पोलिसांनी रामकिशन ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना का अटक केली होती हे स्पष्ट करावे.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

केंद्राच्या जवानांबद्दलच्या दुटप्पी धोरणामुळे माजी सैनिकाच्या आत्महत्येची घटना घडली आहे. माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्राने सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे.
- नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री

ग्रेवाल कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते - व्ही. के. सिंह
वन रॅंक वन पेन्शनच्या मागणीसाठी आत्महत्या करणारे रामकिशन ग्रेवाल हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर सरपंचपदाची निवडणूकही लढवली होती, असे वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केले. रामकिशन यांचा वाद बॅंकेसोबत होता, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. त्यांनी आमच्याकडे दाद मागायला हवी होती, असेही ते म्हणाले. व्ही. के. सिंह यांनी ग्रेवाल यांची मानसिक आरोग्याची तपासणी व्हायला पाहिजे, असेही वादग्रस्त वक्तव्य केले होते. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार राज बब्बर यांनी या वक्तव्याचा समाचार घेताना, "त्या' सैनिकाऐवजी व्ही. के. सिंह यांच्या मानसिक आरोग्य तपासणीची गरज असून, अशी व्यक्ती स्वत:च्या नावापूर्वी "जनरल' लिहितात हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

Web Title: OROP suicide: Rahul Gandhi arrives at residence of Ram Kishan Grewal in Bhiwani