योगी अदित्यनाथ यांनी कार्यालयही केले भगवे

पीटीआय
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

योगी अदित्यनाथ हे कायम साधू परिधान करत असलेल्या भगव्या वस्त्रांमध्ये वावरत असतात. त्यामुळेच त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर कार्यालयातील खुर्चीवरील वस्त्रे, कार्यालयातील पडद्यांचे रंग हे सगळे भगव्या रंगाचे केले होते. आता त्या सगळ्याला साजेल असेच कार्यालय असावे या हेतुने संपुर्ण कार्यालयाला भगवा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या लखनौ येथील कार्यालयाला पारंपारिक रंगाला फाटा देत पूर्ण कार्यालय भगवेमय करण्यास सुरवात केली आहे. 

लाल बहादुर शास्त्री भवन म्हणजेच सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या इमारतीला पारंपारिक काळा आणि पांढरा रंग वगळून भगवा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इमारतींचा बाह्य भाग हा छतापर्यंत पूर्णपणे भगव्या रंगाने रंगवण्यात येणार आहे. सचिवांचे मुख्य कार्यालय असलेली ही इमारत याआधी पारंपारिक काळ्या आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेली होती. परंतु, नुकत्याच काढलेल्या रंग बदलण्याच्या प्रस्तावानुसार इमारतीला भगवा रंग देण्याचा प्रस्ताव सगळ्याच्या संगनमतानुसार मंजुर करण्यात आला. रंग देण्याचे काम सुरुही झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

योगी अदित्यनाथ हे कायम साधू परिधान करत असलेल्या भगव्या वस्त्रांमध्ये वावरत असतात. त्यामुळेच त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर कार्यालयातील खुर्चीवरील वस्त्रे, कार्यालयातील पडद्यांचे रंग हे सगळे भगव्या रंगाचे केले होते. आता त्या सगळ्याला साजेल असेच कार्यालय असावे या हेतुने संपुर्ण कार्यालयाला भगवा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातील पडदे, खुर्चीवरील वस्त्रे ही सगळी भगव्या रंगाची असून देखील त्यांना तेथील वातावरण हे भगवेमय वाटत नसल्यामुळे त्यांनी पूर्ण इमारतीलाच भगवा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुत्रांनी सांगितले.

योगी अदित्यनाथ यांनी नुकत्याच लोकार्पण केलेल्या 50 बसेस या भगव्या रंगाच्या होत्या आणि तेथील सर्व सुशोभिकरणसुद्धा भगव्या रंगाने केलेले होते. तसेच, शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमध्ये वितरित केलेल्या बॅगा सुद्धा भगव्या रंगाच्या होत्या. तसेच, योगी सरकारच्या 100 दिवस आणि सहा महिने पुर्ण झाल्यानिमित्त प्रकाशित केलेल्या पुस्तिकांचा रंगही भगवा होता.

विरोधी पक्षाने योगी आदित्यनाथ यांच्याकडून करण्यात येत असलेल्या भगवीकरणावर नाराजी दर्शविली आहे. हा सरकारी इमारतींचे भगवेकरण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. हे राज्य आणि राज्याच्या राजकारणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न चालु आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केला. तसेच, कोणत्याही पक्षाशी संबधित असलेल्या रंगाचा वापर सरकारी कार्यालयाला देणे हे चुकीचे आहे असे मत काँग्रेसचे प्रवक्ते द्विजेंद्र त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

Web Title: From Outer Walls To Terrace, UP CM Yogi Adityanath's Lucknow Office Being Painted In Saffron Colour