1 लाख विद्यार्थ्यांनी दिला जात व धर्म भरण्यास नकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

'न्यायालयीन आदेशांप्रमाणे विद्यार्थ्यांना आपली जात किंवा धर्म लिहीण्यास कोणतेही बंधन नाही, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी जात व धर्म न लिहीण्याचा मार्ग स्विकारला असावा.' असे मोहनकुमार यांनी सांगितले.

तिरूअनंतपूरम : 2017-18 या शैक्षणिक वर्षात केरळमध्ये 1,23,630 विद्यार्थी पहिली ते दहावी या इयत्तांमध्ये शिक्षण घेत आहेत. या मुलांनी सरकारी व शासकीय अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेताना आपली जात व धर्म उघड करण्यास नकार दिला आहे.  

'या वर्षी प्रवेश अर्जामध्ये असलेले जात व धर्माचे कॉलम हे अनेक विद्यार्थ्यांनी रिकामे ठेवल्याचे निदर्शनास आले. दरवर्षी असे होते, पण या वर्षी ही संख्या सर्वाधिक आहे.' असे केरळचे शिक्षणमंत्री सी. रविंद्रनाथ यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. हे विद्यार्थी किमान 9, 209 शाळांतून साधारण 2% इतके आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांचा माहिती मिळू शकते, कारण प्रवेश प्रक्रिया ही 'संपूर्ण सॉफ्टवेअर' या सिस्टीममध्ये नोंदविली जाते.

तथापि, सार्वजनिक सूचना विभागाचे संचालक के. व्ही. मोहनकुमार यांनी या संदर्भात सावधगिरीचा इशारा देऊन म्हटले आहे की, हे 'प्रगतीशील' मानसिकता दर्शवणारे नाही. 'न्यायालयीन आदेशांप्रमाणे विद्यार्थ्यांना आपली जात किंवा धर्म लिहीण्यास कोणतेही बंधन नाही, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी जात व धर्म न लिहीण्याचा मार्ग स्विकारला असावा.' असेही मोहनकुमार यांनी सांगितले.

माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये जात व धर्म उघड न करण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. असे करण्यामागे या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही पाठिंबा असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेत काम करणारे रेजिमॉन कुट्टपन यांनी सांगितले की, 'मी माझ्या दोनही मुलांची जात व धर्म प्रवेश प्रक्रिया अर्जात भरला नाही. माझ्यामते शिक्षण हे आरक्षणावर ठरवले न जाता, ते कौशल्यावर ठरवणे जास्त गरजेचे आहे. माझी मुलं अभ्यासात हुशार नसतील तर त्यांनी दुसरा मार्ग स्विकारावा.' तर सारा जोसेफ या पालकांनी या गोष्टीचे स्वागतच केले आहे. जातीविरहीत समाजासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. जात किंवा धर्म सांगून कोणाचाच फायदा होत नाही, असेही त्या म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 1 lakh students say no to caste in Kerala