4000हून जास्त अतिरेकी, लोक अद्याप पाकमध्येच

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

"गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2010 पासून आतापर्यंत पूर्वी अतिरेकी असेलेले 337 जण त्यांच्या एकूण 864 कुटुंबीयांसह नेपाळ आणि बांगलादेशच्या मार्गाने परत आले आहेत."

जम्मू- येथील चार हजारहून अधिक दहशतवादी आणि इतर लोक अद्याप पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर सरकारने आज (बुधवार) दिली.
भाजपचे आमदार राजेश गुप्ता यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी लेखी उत्तर दिले. त्यामध्ये त्यांनी एकूण 4088 लोक अद्याप परतले नसल्याचे स्पष्ट केले. 

आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातून किती अतिरेकी त्यांच्या कुटुंबांसह स्वगृही परतले याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मुफ्ती म्हणाल्या, "गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2010 पासून आतापर्यंत पूर्वी अतिरेकी असेलेले 337 जण त्यांच्या एकूण 864 कुटुंबीयांसह नेपाळ आणि बांगलादेशच्या मार्गाने परत आले आहेत."

पुनर्वसनासंदर्भात 2010 मध्ये तयार करण्यात आलेल्या धोरणानुसार पूर्वाश्रमीच्या अतिरेक्यांसाठी परतण्याचे चार मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, असे मुफ्ती यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचे गृह मंत्रालयाची जबाबदारी मुफ्ती यांच्याकडे आहे. 

हे धोरण लागू झाल्यापासून एकही तरुण या मंजूर मार्गांनी परतलेला नाही. त्यामुळे त्यांना या 2010च्या धोरणाअंतर्गत असलेले कोणतेही लाभ मिळू शकले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अतिरेक्यांसाठी परतण्याचे चार मार्ग :

  • जेसीपी वाघा अट्टारी, 
  • सलामंदेर, 
  • ताबारेषेजवळील चाकण दा बाघ क्रॉसिंग
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली
     
Web Title: Over 4000 terrorists, missing people of J&K in PoK