इतना सन्नाटा क्‍यों है भाई ?; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य

वृत्तसंस्था
सोमवार, 10 डिसेंबर 2018

डेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही पोचलेली नाही. उत्तराखंडमध्ये याच कारणामुळे दुर्गम भागातील गावे ओसाड पडत आहेत. 
उत्तराखंडमध्ये जवळपास 16,500 गावे आहेत. यापैकी पर्वतीय भागांमधील गावांपैकी 734 गावांमधील सर्वच नागरिक गाव सोडून शहरांकडे गेले आहेत.

डेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही पोचलेली नाही. उत्तराखंडमध्ये याच कारणामुळे दुर्गम भागातील गावे ओसाड पडत आहेत. 
उत्तराखंडमध्ये जवळपास 16,500 गावे आहेत. यापैकी पर्वतीय भागांमधील गावांपैकी 734 गावांमधील सर्वच नागरिक गाव सोडून शहरांकडे गेले आहेत.

कोणत्याच सोयीसुविधा नसल्याने गेल्या सात वर्षांमध्ये या गावांमधील सर्वच नागरिकांनी स्थलांतर केले असून, येथे कोणीही राहात नाही, अशी माहिती राज्याच्या ग्रामीण विकास आणि स्थलांतर आयोगाचे उपाध्यक्ष एस. एस. नेगी यांनी सांगितली. याबाबतचा अहवाल आयोगाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. सर्वांत भयानक परिस्थिती पौडी जिल्ह्याची असून, येथील 298 गावांपैकी 186 गावे निर्जीव झाली आहेत. कोणीही राहात नसल्याने गावांमधील घरांची पडझड झाली असून, सर्वत्र गवताचे साम्राज्य पसरले आहे. विकास नसलेल्या गावांमधून स्थलांतर होणे हे देशात किंवा जगात सर्वत्र असले, तरी सर्व गावानेच स्थलांतरित होण्याचा प्रकार बहुदा फक्त उत्तराखंडमध्येच आढळून आला असल्याचे नेगी यांनी सांगितले. बिहार, उत्तर प्रदेशमधील अविकसित गावांमधूनही लोक स्थलांतर करतात. मात्र, येथील अनेक लोक कामगार म्हणून काम करण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी दुसऱ्या शहरांमध्ये जातात. उत्तराखंडमधील स्थलांतर करणारे लोक मात्र अधिक शिकलेले असल्याने चांगल्या आयुष्यासाठी कायमस्वरूपी स्थलांतरित होतात, असे नेगी यांचे निरीक्षण आहे. 

बिबट्याची भीती 

उत्तराखंडमध्ये काही गावे अशीही आहेत, जेथील लोकसंख्या आठ ते दहा किंवा दोन ते तीन इतकी कमी आहे. येथील लोक बिबट्याच्या भीतीने दुपारी चार वाजताच घराला कड्या लावून स्वत:ला आत कोंडून घेतात. काही गावांमध्ये सर्व पुरुष बाहेरगावी कामासाठी राहात असल्याने गावातील कोणाचे निधन झाल्यास शेजारच्या गावातून माणसे बोलावून आणावी लागतात. 

अहवालातील शिफारसी 

- ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आणावी 
- शिक्षण, उत्पन्नाची साधने, आरोग्य सुविधा गावांमध्ये उपलब्ध करून द्यावी 
- ही गावे पर्वतीय असल्याने येथे ट्रेकिंग, राफ्टींग असे धाडसी पर्यटनाचे उपक्रम आखून स्थानिकांना रोजगार द्यावा 
- या गावांमध्ये शेकडो वर्षे जुनी मंदिरे असल्याने "मंदिर-पर्यटना'वर भर द्यावा 
 

Web Title: Over seven hundred villages are like empty