चिदंबरम म्हणाले, कार्तीला मदत करा - इंद्राणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

इंद्राणी यांचा जबाब...
‘परकी निधी स्वीकारण्याची परवानगी मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे २००८ मध्ये आम्ही चिदंबरम यांना भेटलो. कार्ती यांना भेटून या अडचणी दूर करता येतील, असे चिदंबरम यांनी आम्हाला सांगितले. कार्ती यांना आम्ही दिल्लीतील एका हॉटेलमध्ये भेटलो. त्यांना हे प्रकरण माहीत होते.

परदेशातील त्यांच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्याच्या खात्यात दहा लाख डॉलर जमा करण्यास त्यांनी आम्हाला सांगितले. परदेशात पैसे पाठविणे शक्‍य नसल्याचे आम्ही सांगितल्यावर त्यांनी आम्हाला चेस मॅनेजमेंट आणि ॲडव्हांटेज स्ट्रॅटेजिक या दोन कंपन्यांची नावे सुचवून त्या कंपन्यांच्या खात्यांवर पैसे भरण्याचा पर्याय दिला. या दोन्ही कंपन्या आयएनएक्‍सच्या सल्लागार म्हणून दाखविता येतील, असेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आम्हाला त्यांचा मुलगा कार्ती यांच्या व्यवसायात ‘मदत’ करण्यास आणि आयएनएक्‍स मीडियाला ‘एफआयपीबी’कडून मंजुरी मिळवून देण्याच्या बदल्यात विदेशातील खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले होते, असा जबाब इंद्राणी मुखर्जी यांनी तपास संस्थांकडे दिला आहे. इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचे पती पीटर मुखर्जी हे आयएनएक्‍स मीडिया कंपनीचे प्रमुख आहेत.

इंद्राणी यांचे निवदेन आर्थिक गैरव्यवहारविरोधी कायद्यांतर्गत नोंदविण्यात आले आहे. आपण चिदंबरम यांना दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये त्यांच्या तेव्हाच्या कार्यालयात भेटलो होतो, असेही इंद्राणी यांनी जबाबात म्हटले आहे. इंद्राणी आणि पीटर यांच्यावर त्यांची मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरोप असून, दोघेही सध्या तुरुंगातच आहेत. पीटर मुखर्जी यांनीही ‘ईडी’ला दिलेल्या त्यांच्या जबाबात आयएनएक्‍सच्या व्यवहारासंदर्भात चिदंबरम यांची दोन ते तीन वेळा भेट घेतल्याचे कबूल केले आहे. तसेच, कार्ती यांनाही दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये भेटल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P Chidambaram Talk Karti Help indrani mukerjea