कार्ती चिदंबरमला चेन्नईतून अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पी. चिदंबरम हे 2007 मध्ये केंद्रात मंत्री असताना कार्ती यांचा संबंध असलेल्या आयएनएक्‍स मीडिया कंपनीला परकी निधी मंजूर करण्याप्रकरणी तपास सुरू आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवाऱ) सकाळी चेन्नईतून कार्ती चिदंबरमला अटक केली.

कार्ती चिदंबरम हा आज सकाळी लंडनहून चेन्नई परतताच त्याला सीबीआयने विमानतळाहून अटक केली. नुकतेच कार्ती चिदंबरम याचे सनदी लेखापाल एस. भास्कररमण याला अटक करण्यात आली होती. तो सध्या कोठडीत आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. भास्कररमण यांना गेल्या आठवड्यात दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

पी. चिदंबरम हे 2007 मध्ये केंद्रात मंत्री असताना कार्ती यांचा संबंध असलेल्या आयएनएक्‍स मीडिया कंपनीला परकी निधी मंजूर करण्याप्रकरणी तपास सुरू आहे. सक्तवसुली संचालनालयाने नुकतीच हवालाप्रकरणी आयएनएक्‍स मीडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. दिल्लीमध्ये दहा तास चौकशी केली होती. कार्ती यांच्याविरोधात 'ईडी'ने 'इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट' दाखल केला असून तो पोलिसांच्या 'एफआयआर'प्रमाणेच आहे. 'आयएनएक्‍स मीडिया'चे संचालक पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे.

Web Title: P Chidambaram's Son Karti Chidambaram Arrested By CBI In Money Laundering Case