पाकने पुन्हा अशी चूक करू नये : लष्करप्रमुख 

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने मोठी चूक केली होती. त्याला भारतीय सरकार आणि सैन्याने जे उत्तर दिले होते, ते अजूनही पाकचे सैन्य विसरलेले नाही.

नवी दिल्ली : देशभरात उद्या (ता.26) कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक दिवस अगोदरच भारतीय लष्करप्रमुख बिपिन सिंह रावत यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानला ताकीद देताना त्यांनी म्हटले आहे की, "पाकिस्तान 1999 मधील चूक पुन्हा करणार असेल, तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल." ते पुढे म्हणाले की, मला खात्री आहे की, पाकिस्तान असे पुन्हा करणार नाही. असे झालेच तर आमचे जवान कधीही त्यांचा हेतू यशस्वी होऊ देणार नाहीत.

जनरल रावत म्हणाले, "1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने मोठी चूक केली होती. त्याला भारतीय सरकार आणि सैन्याने जे उत्तर दिले होते, ते अजूनही पाकचे सैन्य विसरलेले नाही."

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याचे चुकीचे वर्णन केले. त्यावर प्रतिक्रिया देताना रावत म्हणाले की, ''तेथे जे काही झाले त्याचे सर्व पुरावे भारतीय सैन्यदलाकडे आहेत. पुलवाम्यात नक्की काय झाले त्याचे पुरावे आमच्या इंटेलिजन्स एजन्सीने आम्हाला दिले आहेत. सत्य काय आहे, हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे कोणाच्याही विधानाने आमच्यावर कोणताही परिणाम होत नाही."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pak should not make such a mistake like Kargil again says Army Chief