अमरनाथ यात्रेच्या मार्गावर आढळले पाक लष्कराचे भुसुरुंग

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पाकिस्तानी लष्कराचे भुसुरुंग आणि स्निपर रायफल सापडली आहे.

नवी दिल्लीः अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पाकिस्तानी लष्कराचे भुसुरुंग आणि स्निपर रायफल सापडली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखला होता, अशी माहिती भारतीय लष्कराने आज (शुक्रवार) दिली.

लेफ्टनंट जनरल के.जे.एस. धिल्लोन, पोलिस महासंचालक दिलबाग सिंग आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे पोलिस महानिरीक्षक झुल्फिकार हसन यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषद ही माहिती दिली. भारतीय लष्कराने घेतलेल्या शोधमोहिमेत एक भुसुरुंग सापडला असून, तो पाकिस्तान मधील फॅक्टरीत तयार करण्यात आला आहे. शिवाय, एम-24 अमेरिकन स्निपर रायफल सापडली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.

दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. शिवाय, पाकिस्तानी शिक्का असलेले भूसुरुंगही लष्कराच्या हाती लागले आहेत. याची काही छायाचित्रे पत्रकारपरिषदेत सादर करताना के.जे.एस. धिल्लोन म्हणाले, 'सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून गेल्या दोन दिवसांपासून शोधमोहीम सुरु असून, आम्हाला चांगले यश मिळाले आहे. पाकिस्तानी लष्कराचा थेट संबंध दर्शवणारे भुसुरुंग आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, काही बॉम्बही सापडले आहेत. परिसरात अद्यापही शोधमोहिम सुरु आहे. शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही.'

यावेळी काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक स्वयं प्रकश पानी यांनी पुलवामा आणि शोपियन येथे 10 हून जास्त वेळा भुसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दिली. 83 टक्के दहशतवाद्यांचा दगडफेकीचा इतिहास असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच काश्मीर खोऱ्यात 10 हजार जवान पाठवून येथील सुरक्षा आणखी कडेकोट केली होती. यामध्ये सीआरपीएफच्या 30 कंपनी, सीमा सुरक्षा दलाच्या 10 आणि इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या 10 कंपन्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan army landmine sniper rifle found in amarnath yatra