पाकिस्तानने केली भारतीय हुतात्म्यांच्या मृतदेहाची विटंबना

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्यामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये भरच पडणार आहे. नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना 'हेर' ठरवून पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच, कुलभूषण जाधव यांना भेट देण्यासही पाकिस्तानने मनाई केली आहे. यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरून राजनैतिक दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

श्रीनगर : शस्त्रसंधीचा भंग करून प्रत्यक्ष ताबारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने आज (सोमवार) भारताच्या दोन हुतात्मा जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 'पाकिस्तानला आम्ही आता सडेतोड प्रत्युत्तर देऊ', असा इशारा भारतीय सैन्याने दिला आहे. 

जम्मू-काश्‍मीरमधील प्रत्यक्ष ताबारेषेनजीक कृष्णा घाटी भागात गस्त घालणाऱ्या तुकडीवर पाकिस्तानने गोळीबार केला. यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या मृतदेहाची विटंबनाही पाकिस्तानी सैनिकांनी केली. पाकिस्तानच्या या कुरापतीमध्ये नायब सुभेदार परमजितसिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हुतात्मा झाले. 'आज सकाळी 8.30 च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने सीमा सुरक्षा दलाच्या ठाण्यांवर जोरदार गोळीबार केला. त्यांनी काही रॉकेट्‌सही डागली,' अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिली. गेल्या महिन्याभरात पूंच आणि राजौरी भागामध्ये पाकिस्तानने सात वेळा शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केला आहे. 

पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्यामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये भरच पडणार आहे. नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना 'हेर' ठरवून पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच, कुलभूषण जाधव यांना भेट देण्यासही पाकिस्तानने मनाई केली आहे. यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरून राजनैतिक दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

उरीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी 'सर्जिकल स्ट्राईक' करत पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर काही काळ सीमेवर शांतता होती. आता पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढण्यास सुरवात केल्यामुळे 'याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ' असा इशारा भारताने दिला. 

Web Title: Pakistan army mutilates bodies of Indian martyrs