पाक युवतीला स्वराज यांच्याकडून विवाहाची भेट!

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

'व्हिसाची अडचण दूर झाल्यामुळे रविवारी (ता. 6) भारतात दाखल झाले आहे. आज (सोमवार) आमचा विवाह पार पडणार असल्यामुळे खूपच आनंद झाला आहे.'
- प्रिया तिवानी

जोधपूर (राजस्थान)- भारतातील वर अन् पाकिस्तानमधील वधू यांच्या विवाहबंधनात अडथळा होता तो व्हिसाचा. परंतु, भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे अडथळा दूर झाला अन् स्वराज यांनी एकप्रकारे विवाहाची भेटच दिली.

जोधपूरमधील नरेश तिवानी याचे पाकिस्तानमधील प्रिया बच्चानी हिच्याशी विवाह ठरला होता. विवाहाची तारीखसुद्धा (7 नोव्हेंबर) काढण्यात आली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून भारत-पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारत-पाक सीमेवर गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामुळे प्रियाला व्हिसा मिळण्यात अडचण येत होती. यामुळे दोन्ही कुटुंबियांमध्ये काळजीचे वातावरण पसरले होते. प्रियाने पाकिस्तानधील भारतीय दुतावासाकडून आपल्याला व कुटुंबियांना व्हिसा मिळत नसल्याचे ट्विट सुषमा स्वराज यांना केले होते. स्वराज यांनी तातडीने लक्ष घालत प्रिया व तिच्या 35 कुटुंबियांना व्हिसा मिळवून दिला आहे. यामुळे भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने विवाहातील मुख्य अडचण दूर झाली आहे.

प्रिया म्हणाली, 'व्हिसाची अडचण दूर झाल्यामुळे रविवारी (ता. 6) भारतात दाखल झाले आहे. आज (सोमवार) आमचा विवाह पार पडणार असल्यामुळे खूपच आनंद झाला आहे.' नरेश म्हणाला, प्रियाची ट्विटची दखल घेत तिला व तिच्या कुटुंबियांना तत्काळ व्हिसा मिळवून दिल्याबद्दल सर्व मंत्र्यांचे आभार. प्रियाचे कुटुंबिय दोन टप्प्यात भारतात येणार आहेत.

दरम्यान, नरेश तिवानी व कराचीमधील प्रियाचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी व तिचे कुटुंब जोधपूरला आले होते. परंतु, प्रियाच्या वडिलांनी आपल्या निवृत्तीपर्यंत विवाह करायचा नाही, असे ठरवल्याने विवाहाची तारीख लांबली होती. ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर विवाहाची तारीख काढण्यात आली होती.

Web Title: Pakistan bride arrives in Rajasthan; 'wedding gift' from Sushma Swaraj