पाकच्या नापाक कारवाया यावर्षी वाढल्या; राजस्थान-गुजरात सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

जम्मू-काश्मीर तसेच पंजाबच्या सीमेवरुन दहशतवादी पाठवण्यासाठी वेगवेगळे मार्ग पाकिस्तानने आजमावले आहेत.

नवी दिल्ली : संपण्याच्या वाटेवर असणाऱ्या 2020 या वर्षी पाकिस्तानने अनेक मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीर तसेच पंजाबच्या सीमेवरुन दहशतवादी पाठवण्यासाठी वेगवेगळे मार्ग पाकिस्तानने आजमावले आहेत. बॉर्डर सिक्योरीटी फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर देखील पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

या वर्षी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात वाढ झाल्याचे निरिक्षण देखील BSF ने नोंदवले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर घुसखोरीचे कोणतेही प्रयत्न आढळून आलेले नव्हते. काश्मीरच्या सीमेवर यावर्षी फक्त एक घुसखोरीची घटना आढळून आली. मात्र गेल्यावर्षी तब्बल चारवेळा याप्रकारचे प्रयत्न झाले होते. यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर घुसखोरी करण्याच्या घटना आढळून आल्या आहेत.  अधिकाऱ्यांनी असा दावा केलाय की, पाकिस्तानने वेगवेगळ्या मार्गांनी दहशतवाद्यांद्वारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र BSF च्या दक्ष आणि सुसज्ज  पहाऱ्यामुळे हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. एका वरिष्ठ BSF अधिकाऱ्याने सांगितलं की, यावर्षी गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न पहायला मिळाले मात्र मागील वर्षी अशा प्रकारची कोणतीही घटना पहायला मिळाली नव्हती. 

हेही वाचा - 'काही लोक मला दररोज लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करतात'; PM मोदींचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला
BSF च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल 11 घुसखोरीच्या प्रयत्नांची नोंद झाली आहे. यामध्ये जम्मू, काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर या घटना घडल्या आहेत.  नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरमधील सांबा भागातील सीमेवर जवळपास 150 लांबीचा एक बोगदा खोदलेला आढळून आला. या बोगद्याचा वापर भारतात घुसखोरी करण्यासाठी म्हणून दहशतवाद्यांकडून वापरला जात असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan explored Rajasthan Gujarat borders for infiltration in 2020