दहशतवादाची पाककडून निर्यात - नरेंद्र मोदी

पीटीआय
रविवार, 25 सप्टेंबर 2016

मोदी म्हणाले...

- पाकिस्तानला जगात एकटे पाडण्यासाठी अजून प्रयत्न करणार

- जवानांच्या शौर्याचा अभिमान

- जवानांची ताकद नागरिकांच्या मनोबलांत

- भारताकडून सॉफ्टवेअरची; तर पाककडून दहशतवादाची निर्यात

- मागील वर्षांत ११० दहशतवादी मारले

कोझीकोडे - ‘‘आशियातील सर्व देश विकासाच्या मार्गावर जात असताना फक्त एकाच देशाला दहशतवादाची निर्यात करण्यात आणि हिंसाचार पसरविण्यात रस आहे. आशियात कोठेही झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाळेमुळे पाकिस्तानपर्यंत पोचतात. सर्व दहशतवादी ओसामा बिन लादेनप्रमाणे पाकिस्तानचाच आश्रय घेतात,’’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानवर थेट टीका केली. बलुचिस्तानचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत काश्‍मीरमध्ये लक्ष न घालण्याचा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. 

 

उरी येथील ब्रिगेडच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची आज प्रथमच सभा झाली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी येथे आलेल्या मोदी यांनी सभा घेत उरी हल्ल्याबाबत पाकिस्तानवर प्रथमच थेट टीका केली. दहशतवादाबाबत बोलताना पाकिस्तानचा ‘शेजारी देश’ असा सुरवातीला उल्लेख करणाऱ्या मोदी यांनी नंतर मात्र थेट नाव घेत चौफेर हल्ला केला. ते म्हणाले, की गेल्या काही काळात पाकिस्तानच्या भूमीतून झालेले १७ घुसखोरीचे प्रयत्न आपल्या शूर जवानांनी हाणून पाडले. एक प्रयत्न यशस्वी झाला आणि आपले १८ जण हुतात्मा झाले. दहशतवादासमोर भारत झुकला नाही आणि झुकणारही नाही, असे स्पष्ट करतानाच मोदी यांनी उरीतील बलिदान देश कधीही विसरणार नाही, असा इशाराच दहशतवाद्यांना दिला. काश्‍मीरप्रश्‍नी ढवळाढवळ करणाऱ्या पाकिस्तान सरकारला समज देताना पाकव्याप्त काश्‍मीर, सिंध, गिलगीट आणि बलुचिस्तान हे तुमच्या ताब्यात आहे, ते आधी सांभाळा, असे मोदी यांनी ठणकावले. पूर्व बंगाल ताब्यात असताना तो सांभाळता आला नाही, याचीही आठवण मोदींनी पाकिस्तानला करून दिली.  

 

सरकार गरिबांसाठीच

केंद्र सरकार गरिबांसाठीच काम करत असून, त्यांच्यासाठी अनेक योजना राबवित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. महात्मा गांधी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारांच्या प्रभावाखालीच सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. यंदाचे हे दीनदयाळ जन्मशताब्दी वर्ष गरिबीविरोधात लढण्याचे वर्ष करण्याचे ठरले असून, यात यशस्वी होण्यासाठी देवभूमी म्हणून मानली जाणाऱ्या केरळने आम्हाला आशीर्वाद द्यावा, असे सांगत मोदी यांनी २१व्या शतकात भारत हा सर्व समस्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प करण्याचे नागरिकांना आवाहन केले. 

 

केरळमधील नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मोदी यांनी भाषणाच्या सुरवातीला मल्याळी भाषेतूनच आभार मानले. नंतर मात्र त्यांच्या हिंदी वाक्‍यांचा मल्याळी भाषेतून अनुवाद करून सांगितला गेला. या वेळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह वेंकया नायडू, नितीन गडकरी, लालकृष्ण अडवानी, राजनाथसिंह हे माजी अध्यक्ष, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपशासित राज्यांचे बहुतेक मुख्यमंत्री उपस्थित होते. 

 

पाक नागरिकांना ‘लढाई’चे आव्हान

‘भारताविरोधात हजार वर्षे लढण्याची भाषा करत दिशाभूल करणारे तुमचे नेते काळाच्या ओघात गडप झाले. मात्र, तुम्हाला लढण्याची इच्छा असल्यास हे आव्हान आम्ही स्वीकारतो; पण ही लढाई गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी यांच्याविरुद्ध लढू. यात भारत जिंकतो की पाकिस्तान ते बघू,’ असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानच्या नागरिकांना दिले. मोदी यांनी १९४७ पूर्वीच्या अखंड भारताचे स्मरण करून देत पाकिस्तानमधील नागरिकांना ‘लढाई’चे थेट आव्हान देत गरिबी, निरक्षरता, बालमृत्यू, बेरोजगारी या ‘शत्रूं’विरोधात लढण्याचे आवाहन केले. पाकिस्तानी नेते हे तेथील जनतेची दिशाभूल करत असून, हे नागरिक लवकरच दहशतवाद्यांची भाषा बोलणाऱ्या त्यांच्या सरकारविरोधात आणि दहशतवादाविरोधात रस्त्यावर उतरेल, असे मोदी म्हणाले; तसेच भारताचा विकास होत असताना पाकिस्तानात समस्या कशा, असा प्रश्‍न तुमच्या राज्यकर्त्यांना करा, असे आवाहनही मोदी यांनी पाकिस्तानच्या जनतेला केले. 

Web Title: Pakistan is exporting terrorism, says PM Narendra Modi