काश्मीर पाकिस्तानचा होता कधी?; राजनाथसिंह यांचा सवाल

पीटीआय
Thursday, 29 August 2019

- पाकिस्तानचा जम्मू-काश्‍मीरशी काहीही संबंध नाही.

- व्याप्त काश्‍मीरवरील त्यांचा ताबाही बेकायदा स्वरूपाचा.

- गिलगिट बाल्टिस्तानचाही समावेश.

लेह : पाकिस्तानचा जम्मू-काश्‍मीरशी काहीही संबंध नाही. व्याप्त काश्‍मीरवरील त्यांचा ताबाही बेकायदा स्वरूपाचा असून, यामध्ये गिलगिट बाल्टिस्तानचाही समावेश होतो. मला पाकिस्तानला विचारायचे आहे, की जम्मू-काश्‍मीर कधी त्यांच्या ताब्यात होते, असा सवाल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केला.

'डीआरडीओ'च्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, जम्मू- काश्‍मीरबाबत पाकिस्तानची अवस्था ही "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना' अशी आहे, विद्यमान स्थितीमध्ये याच विषयावरून एकही देश पाकिस्तानला समर्थन देताना दिसत नाही. दहशतवादाच्या माध्यमातून भारतामध्ये अराजक निर्माण करू पाहणाऱ्या पाकिस्तानशी कशी काय चर्चा केली जाऊ शकेल, असा सवालही त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, भारताला पाकिस्तानसोबत उत्तम मैत्रीसंबंध हवे आहेत; पण त्यांनी आमच्याविरोधातील दहशतवादी कारवाया थांबवाव्यात. पाकिस्तानचा जम्मू- काश्‍मीरशी काहीही संबंध नाही. व्याप्त काश्‍मीरवरील त्यांचा ताबाही बेकायदा स्वरूपाचा असून, यामध्ये गिलगिट बाल्टिस्तानचाही समावेश होतो. मला पाकिस्तानला विचारायचे आहे, की जम्मू- काश्‍मीर कधी त्यांच्या ताब्यात होते? पाकिस्तानची निर्मितीही भारतापासूनच झाली आहे. आम्ही पाकच्या अस्तित्वाचा आदर करतो; पण याचा अर्थ असा होत नाही, की त्यांनी काश्‍मीरबाबत काहीही बोलत राहावे.

काश्‍मीर आमचा होता, देशामध्ये याबाबत कोणाच्याही मनात साशंकता नव्हती. सत्य हे आहे, की गिलगिट बाल्टीस्तानवरील पाकचा कब्जा बेकायदा आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये होणाऱ्या मानवी हक्काच्या उल्लंघनावर पाकने लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले. 

समस्यांवर तोडगा काढला 

लडाखला वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी आम्ही कायदा तयार केला, या माध्यमातून आम्ही केवळ स्थानिक लोकांच्या भावनांचा आदरच केला नाही, तर त्यांच्या समस्यांवरदेखील तोडगा काढला आहे. आमच्या पंतप्रधानांची भूमिका स्पष्ट असून रणनीतिक बाबतीत आम्ही स्थानिक पातळीवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करू, असेही राजनाथ यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan has no locus standi on Kashmir says Rajnath Singh