पाककडून छुपे युद्ध - पर्रीकर

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

बडगाम (जम्मू-काश्‍मीर) - पाकिस्तान जम्मू-काश्‍मीरमध्ये छुपे युद्ध करत असले तरी त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज स्पष्ट केले आहे. पर्रीकर हे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.

बडगाम (जम्मू-काश्‍मीर) - पाकिस्तान जम्मू-काश्‍मीरमध्ये छुपे युद्ध करत असले तरी त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज स्पष्ट केले आहे. पर्रीकर हे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.

माजी सैनिकांच्या एका कार्यक्रमादरम्यान पर्रीकर म्हणाले, ""जम्मू-काश्‍मीरवर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. आम्ही मात्र ही भूमी आणि येथील माणसे भारताचा अविभाज्य घटक असल्याचे मानतो. समोरासमोरील युद्धांत पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागत असल्याने ते आता छुपे युद्ध करत आहेत. त्यांनी देशाच्या इतर भागांतही हल्ले केले आहेत. त्यांच्या या हल्ल्यांना आपले जवान योग्य प्रत्युत्तर देत आहेत. या छुप्या युद्धाला आणि दहशतवादाला तोडीस तोड उत्तर देण्याची आपण प्रतिज्ञा करू.'' पाकिस्तानचे सरकार त्यांच्या आणि जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पर्रीकरांनी या वेळी केला.

जम्मू-काश्‍मीरमधील अशांततेबाबतही पर्रीकर यांनी भूमिका मांडली. "केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जनतेनेच निवडून दिलेले सरकार असून, ते जनतेच्या कल्याणासाठी झटत आहे. भरकटलेले युवक "काश्‍मीरियत'वरच हल्ला करत असून, ते शाळा जाळत असल्याने निष्पाप मुलांचे भविष्य धोक्‍यात येत आहे,' असे पर्रीकर म्हणाले. शाळा वाचविण्यासाठी लष्कर प्रयत्न करत आहेतच; पण नागरिकांनीही शाळा वाचविण्याचा ध्यास घेण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

पाकमुळे काश्‍मीरमध्ये अशांतता
मागील चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या पाठिंब्यावर काही समाजकंटक जम्मू-काश्‍मीरमधील शांतता नष्ट करत असल्याचा आरोप मनोहर पर्रीकरांनी केला. ते म्हणाले, ""अशांततेमुळे काश्‍मीरच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. या राज्यामध्ये पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून मोठी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. ही क्षमता सिद्ध करण्यासाठी शांतता आवश्‍यक आहे.'' पर्रीकरांनी या वेळी 1947 मध्ये हुतात्मा झालेल्या मेजर सोमनाथ शर्मा आणि इतर जवानांना आदरांजली वाहिली.

दिवसभरात काय घडले?
- आत्महत्या केलेले माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या अंत्यसंस्काराला राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांची गर्दी
- हरियाना सरकारकडून ग्रेवाल कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देण्याची घोषणा
- ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना अरविंद केजरीवालांकडून एक कोटीची मदत जाहीर
- ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण दिल्ली पोलिसच्या गुन्हे शाखेकडे सोपविले
- राहुल गांधी, अरविंद केजरीवाल फक्त "चमको' राजकारणी ः भाजपचा हल्ला
- रामकिशन ग्रेवाल कॉंग्रेसचे कार्यकर्ते ः व्ही. के. सिंह यांचे वक्तव्य

Web Title: Pakistan hidden war