पाककडून शस्त्रसंधीचा भंग; तोफगोळ्यांच्या माऱ्यात नागरिक जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

पाक लष्कराने राजौरी आणि पूँच जिल्ह्यातील बालाकोट, धार, लाम्बिबरी, राजधानी, मनकोटे, संदोते आदी भागांत सकाळी तोफगोळ्यांचा मारा केला. यामध्ये रझा नावाचा नागरिक जखमी झाला असून, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले

जम्मू - पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करताना आज जम्मू-काश्‍मिरच्या पूँच-राजौरी भागातील अनेक गावे आणि भारतीय लष्कराच्या चौक्‍या लक्ष्य करत तोफगोळ्यांचा मारा केला. यामध्ये एक नागरिक जखमी झाला. भारतीय लष्करानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी लष्कराने आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास भिम्भेर गली सेक्‍टरमधील नौशेरा भागातील भारतीय लष्कराच्या चौक्‍यांच्या दिशेने गोळीबार केला. भारतीय लष्करानेही याला जोरदार आणि परिणामकारक प्रत्युत्तर दिल्याचे एका संरक्षण प्रवक्‍त्याने सांगितले.

पाक लष्कराने राजौरी आणि पूँच जिल्ह्यातील बालाकोट, धार, लाम्बिबरी, राजधानी, मनकोटे, संदोते आदी भागांत सकाळी तोफगोळ्यांचा मारा केला. यामध्ये रझा नावाचा नागरिक जखमी झाला असून, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानने काल पाचवेळा शस्त्रसंधीचा भंग करताना अनेक गावे आणि चौक्‍यांच्या दिशेने तोफगोळ्यांचा मारा केला होता. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले होते, तर सहा लोक जखमी झाले होते. गेल्या दोन दिवसांतील पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सुमारे 8 हजार नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. प्रशासनाने राजौरीतील अनेक सरकारी शाळांमधील 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची सुखरूप सुटका केली.

पाकच्या उलट्या बोंबा
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करणाऱ्या पाकिस्तानने बुधवारी भारतावरच शस्त्रसंधी भंग केल्याचा आरोप करत भारतीय उपउच्चायुक्त जे. पी. सिंह यांना पाचारण केले. नियंत्रण रेषेवरील भारतीय लष्कराच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याचा कांगावा करत पाकने सिंह यांना समन्स जारी केले.

Web Title: Pakistan violates ceasefire again